वर्षाच्या अखेरच्या दिवशी चिमुकल्यानं दिलं गोव्याला मोठं गिफ्ट; लियोन मेंडोंसा बनला गोव्याचा दुसरा ग्रॅण्डमास्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 02:50 PM2020-12-31T14:50:24+5:302020-12-31T14:51:22+5:30
लियोनची कहाणी फार प्रेरणादायी आहे. गेल्या १८ मार्चपासून लियोन आणि त्याचे आर्इ,वडिल कोरोनामुळे युरोपमध्येच अडकले होते. त्यांच्यापुढे मोठे संकट ठाकले होतं. भारतात परतण्याचे मार्ग बंद होते. कारण येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती . त्यामुळे त्यांनी युरोपमध्ये थांबणे पसंत केले.
सचिन कोरडे(पणजी)
कोरोनामुळे सगळं क्रीडा क्षेत्र हादरलं. सगळीकडे नकारात्मक वातावरण पसरत असताना सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी गोव्याला गोड बातमी मिळाली. बुद्धिबळातील सर्वोच्च असलेला ‘ग्रॅण्डमास्टर’ हा किताब अवघ्या १४ वर्षीय मुलाने मिळवला. लियोन मेंडोंसा ( Leon Mendonca ) हे त्याचे नाव. त्याच्या रुपात गोव्याला आता दुसरा ग्रॅण्डमास्टर मिळालाय. अनुराग म्हामल हा गोव्याचा पहिला ग्रॅण्डमास्टर आहे.
लियोनची कहाणी फार प्रेरणादायी आहे. गेल्या १८ मार्चपासून लियोन आणि त्याचे आर्इ,वडिल कोरोनामुळे युरोपमध्येच अडकले होते. त्यांच्यापुढे मोठे संकट ठाकले होतं. भारतात परतण्याचे मार्ग बंद होते. कारण येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती . त्यामुळे त्यांनी युरोपमध्ये थांबणे पसंत केले. संघर्ष आणि कठिण वेळेतूनही यशाचा मार्ग साधता येतो असा सकारात्मक विचार त्यांनी केला. त्यामुळेच लियोनला त्यांनी विविध ऑनलाइन स्पर्धेत खेळविले. त्यानेही स्पर्धा गाजवल्या.
लियोन हा बुद्धिबळातील कुशाग्र खेळाडू आहे. हे त्याने यापूर्वीच दाखवून दिलं. गेल्या ९ महिन्यांत लियोनने १६ स्पर्धा खेळल्या. २४५२ अशा रेटींगपासून त्याने २५४४ या रेटींगपर्यंत मजल मारली. लियोनने पहिला ग्रॅण्डमास्टर नॉर्म १६ ते २४ आक्टोबर दरम्यान झालेल्या चेस जीएमआर स्पर्धेत मिळवला. त्यानंतर बुदापेस्ट (७ ते १७ आक्टो) आणि इटलीत २६ ते ३० डिसेंबर दरम्यान व्हर्गिनी चषकात मिळवला. कोरोनाकाळातही बुद्धिबळाचा पट गाजवणाऱ्या या लहानशा खेळाडूवर आता अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अखिल भारतीय बुद्धबळ संघटनेचे खजिनदार आणि गोवा बुदधबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर लियोनच्या कामगिरीबाबत म्हणाले की, वर्षाचा शेवट खूप गोड झाला. लियोनच्या रुपात बुदिबळातील उगवता तारा या देशाला मिळाला आहे. एवढ्या कमी वयात उत्तुंग भरारी मारली. संपूर्ण गोव्याला लियोनवर गर्व आहे. तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे संजय बेलूरकर यांनी लियोनला आम्ही सुरुवातीपासून खेळताना पाहात आलो आहे. तो नक्की कमाल करेल, असे वाटत होते मात्र त्याने तर खूप कमी वयात ग्रण्डमास्टर किताब मिळवला. त्याचे खूप अभिनंदन.