नेशन्स कपमध्ये गोव्याच्या आश्रेयाचा ‘पंच’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 21:06 IST2019-08-20T21:05:44+5:302019-08-20T21:06:57+5:30
महिला ज्युनियर बॉक्सरला ४ सुवर्णपदके: १२ पदकांसह भारत उपविजेता

नेशन्स कपमध्ये गोव्याच्या आश्रेयाचा ‘पंच’
पणजी : सर्बिया येथे झालेल्या तिसऱ्या नेशन्स चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या ज्युनियर मुलींनी पदकांची लयलूट केली. यामध्ये गोव्याची आश्रेया नाईक ही सुद्धा चमकली. आश्रेयाने कांस्यपदक पटकाविले. ६३ किलो गटात तिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, अत्यंत चुरशीच्या सामन्यात तिला सर्बियाच्या अलेक्झांड्रा तेपवाक हिच्याकडून ३-२ ने पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या तमन्ना (४८ किलो), आंबेशेरी देवी (५७), प्रीती दहिया (६० किलो) यांनी सुवर्णपदक पटकाविले. हरियाणाची तमन्ना ही सर्वाेत्कृष्ट बॉक्सर ठरली. तमन्नाने ४८ किलो गटात सुवर्णमय कामगिरी केली. तिने रशियाच्या अॅलेना ट्रेमासोवा हिचा ५-०ने पराभव केला. भारतीय संघ स्पर्धेत दुसºया स्थानावर राहिला.
हरियाणाच्या प्रियंका हिने जबरदस्त प्रदर्शन करीत रशियाच्या ओल्गा पेट्राश्को हिचा ५-० ने पराभव केला. ५० किलो गटात, कर्नाटकच्या अंजू देवी हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ती रशियाच्या अनास्तासिया किरिएन्कोकडून पराभूत झाली. ५२ किलो गटात महाराष्ट्राची रायझिंग स्टार सिमरन वर्मा हिला रशियाच्या वेलेरिया लिन्कोवाकडून ५-० ने पराभूत व्हावे लागले.
दरम्यान, या स्पर्धेत २० देशांतील १६० बॉक्सर्सनी भाग घेतला. भारताच्या संघात एकूण १३ खेळाडूंचा समावेश होता. भारतीय संघाने मिळवलेली १२ पदके या स्पर्धेतील मोठे यश ठरले.