‘लोकमत व्हर्च्युअल रन’मध्ये नऊवारीत धावली गोव्याची कविता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 05:59 PM2020-10-05T17:59:10+5:302020-10-05T17:59:49+5:30
जगात स्वप्नांच्या मागे धावणारे खूप आहेत. पण आरोग्य सांभाळण्यासाठी धावणारे तसे कमीच. गोव्याच्या कविता चाटी (मूळ अकोला-महाराष्ट्र) ‘हाउसवाईफ’ जरी असल्या तरी आरोग्याच्या बाबतीत त्या खूप जागरूक आहेत.
- सचिन कोरडे
पणजी : जगात स्वप्नांच्या मागे धावणारे खूप आहेत. पण आरोग्य सांभाळण्यासाठी धावणारे तसे कमीच. गोव्याच्या कविता चाटी (मूळ अकोला-महाराष्ट्र) ‘हाउसवाईफ’ जरी असल्या तरी आरोग्याच्या बाबतीत त्या खूप जागरूक आहेत. कधी काळी केवळ एक किलोमीटरची शर्यतही पूर्ण न करणाºया कविता आता ५-१० किलोमीटर सहज धावतात. नुकताच ‘लोकमत’ने आयोजिलेल्या ‘नाईन यार्ड व्हर्च्युअल रन’ शर्यतीत त्यांनी अनोख्या पद्धतीने भाग घेतला. मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवत त्यांनी नऊवारी साडीत पाच किमीची शर्यत पूर्ण केली.
कविता चाटी या गेल्या अठरा वर्षांपासून गोव्यात आहेत. दोन मुलांपैकी एक मोठा मुलगा आल्हाद चाटी हा राष्ट्रीय जलतरणपटू आणि दत्त चिकित्सकही आहे. त्यांचा संपूर्ण परिवार आरोग्याबाबत जागरूक आहे. त्यामुळे कविता यांनी सुद्धा आरोग्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार याकडे लक्ष दिले. आता त्या गोव्यात आयोजित होणाºया प्रत्येक मॅरेथॉन स्पर्धेत धावतात. ‘लोकमत’ने आयोजिलेल्या स्पर्धेतही त्यांचा अग्रणी सहभाग राहिला आहे.
त्या म्हणतात, नऊवारी साडी संस्कृतीचे प्रतीक आहे. ती नेसून धावणे म्हणजे मला भारतीय संस्कृतीची सेवा करायची संधी मिळाल्यासारखे आहे. ‘लोकमत’ने ही संधी मिळवून दिली त्याबद्दत त्यांची आभारी आहे. माझ्या या मोहिमेला माझ्या कुटुंबाचा, तसेच माझ्या सर्व मैत्रिणींचा फार मोठा हातभार आहे. या सर्वांच्या सहकार्याने मी नऊवारीत पाच किलोमीटरची शर्यत पूर्ण करू शकले.
पहिल्यांदाच नऊवारीत
मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच नऊवारी नेसून धावली आहे. ही माझी तिसरी व्हर्च्युअल रन होती. सध्याच्या कोरोनाच्या संकटात सगळीकडे नैराश्याचे वातावरण आहे. शरीर सशक्त आणि निरोगी ठेवणे आजच्या काळाची नितांत गरज आहे. कधी कधी मनात डोकावणारी निराशा दूर झटकून टाकण्याची यातून ताकद मिळते. त्यामुळे प्रत्येक महिलेने स्वयंस्फूर्तीने धावायला पाहिजे, असे कविता चाटी यांनी सांगितले.