क्रीडामंत्र्यांच्या भेटीने समाधान न झाल्याने बजरंग कोर्टात जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 05:10 AM2018-09-22T05:10:16+5:302018-09-22T05:11:08+5:30
राजीव गांधी खेलरत्न क्रीडा पुरस्कारातून डावलल्याने नाराज स्टार मल्ल बजरंग पुनिया याने क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांची भेट घेतली
नवी दिल्ली : राजीव गांधी खेलरत्न क्रीडा पुरस्कारातून डावलल्याने नाराज स्टार मल्ल बजरंग पुनिया याने क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांची भेट घेतली खरी; पण केवळ विचार करण्याचे आश्वासन मिळाल्याने त्याचे समाधान झाले नाही. पुरस्कारासाठी मी पात्र नाही का?, अशी वारंवार विचारणा करीत बजरंगने न्यायालयात दाद मागण्याचा पुनरुच्चार केला. दुसरीकडे वेळ कमी असल्याचे सांगून ऐनवेळी बजरंगचे नाव यादीत समाविष्ट होण्याची शक्यता नाही, असे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
बजरंग म्हणाला, ‘मला शुक्रवारी क्रीडामंत्र्यांना भेटायचे होते. माझ्या नावाचा विचार न होण्याचे कारण काय, अशी मंत्र्यांना मी विचारणा केली. त्यांनी मला गुणांची पूर्तता होत नसल्याचे कारण दिले, पण हे चुकीचे आहे. विराट कोहली व मीराबाई चानू या दोघांच्या तुलनेत माझे गुण अधिक आहेत.’
२४ वर्षांच्या बजरंगने आशियाड व राष्टÑकुलचे सुवर्ण जिंकले आहे. सायंकाळपर्यंत अपेक्षित उत्तर न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्यास बाध्य व्हावे लागेल, असा इशारा बजरंगने दिला. यावेळी त्याचे मेंटर आणि आॅलिम्पिक कांस्य विजेते मल्ल योगेश्वर दत्त उपस्थित होते.बजरंग पुढे म्हणाला, ‘मला न्याय हवा आहे. यावर मंत्री म्हणाले,‘मी या प्रकरणाचा गंभीर तपास करेन.’
>अखेरच्या क्षणी विचार होण्याची शक्यता कमी
गोल्डकोस्ट आणि जकार्ता येथे सुवर्ण जिंकण्याशिवाय बजरंगने २०१४ च्या राष्टÑकुल तसेच आशियाचे रौप्य पदक जिंकले होते. त्याआधी २०१३ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पटकविले.
पुरस्कारासाठी गुणप्रणाली मात्र २०१४ साली सुरू झाली. याशिवाय निवड समिती सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या खेळाडूच्या नावाची शिफारस खेलरत्नसाठी स्वत:हून करू शकत नाही. विशेष अपवादात्मक स्थितीत मात्र सर्वाधिक गुण मिळविणाºयाच्या नावाची शिफारस केली जाऊ शकते.
अखेरच्या क्षणी बजरंगच्या नावाचा विचार होण्याची शक्यता क्षीण असल्याचे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. सूत्रानुसार मंत्री आणि बजरंग यांच्यात चर्चा झाली. राठोड यांनी बजरंगची तक्रार ऐकून घेतली. त्याच्या नावावर विचार का झाला नाही, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी लक्ष घालण्याचे त्यांनी आश्वासनही दिले, पण पुरस्कार यादी बदलण्याची शक्यता नाहीच.