राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला जलतरणमध्ये सुवर्ण पदक
By admin | Published: February 2, 2015 03:27 AM2015-02-02T03:27:01+5:302015-02-02T03:27:01+5:30
केरळमध्ये सुरू असलेल्या ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांच्या जलतरण संघाने ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये फ्रिस्टाईल प्रकारात राष्ट्रीय
पुणे : केरळमध्ये सुरू असलेल्या ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांच्या जलतरण संघाने ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये फ्रिस्टाईल प्रकारात राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. या संघाने ३ मिनिटे ४.५७ सेकंदांची प्रभावी वेळ दिली. या स्पर्धेतील पहिले पदक मिळविण्याचा मान वेटलिफ्टिंगमध्ये दीक्षा गायकवाड हिने मिळविला. दीक्षाने ५३ किलो वजन गटात रौप्य पदक पटकाविले.
टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने अव्वल मानांकित दिल्ली संघाचा २-०ने धुव्वा उडवत खळबळजनक विजयाची नोंद केली. कुमार मंगलम टेनिस संकुलात महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरे हिने प्रेरणा भांब्रीचा ६-१, ६-३ ने तर मीहिका यादव हिने करमन कौरचा ६-३, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
जलतरणमध्ये १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात जोत्स्ना पानसरे हिने १ मिनिट ०५.४६ सेकंद वेळ नोंदवत महाराष्ट्राला रौप्यपदक जिंकून दिले. २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये मोनिक गांधी हिने २ मिनिटे ९.४४ सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक पटकाविले. पुरुष गटात २०० मीटर फ्रिस्टाईलमध्ये सौरभ सानवेकरने २ मिनिटे ९. ४४ सेकंद वेळ नोंदवत कांस्य मिळवले. तर पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये फ्रीस्टाईल प्रकारात ३ मिनिटे ३३. १० सेकंद वेळ नोंदवत महाराष्ट्र संघाने रौप्यपदक पटकाविले.
कुस्तीमध्ये ग्रिको रोमन प्रकारातील ५६ किलो वजनगटात महाराष्ट्राच्या वसंत सरवदे याने रौप्य पदक मिळविले. तर खोखोमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी ओडिशाचा १ डाव व ६ गुणांनी धुव्वा उडविला. स्क्वॉशमध्ये महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू उर्वशी जोशी व जुई कलगूटकर यांनी महिला गटात तर अर्जुन अग्निहोत्री, ऐश्वरी सिंग व अभिनव सिन्हा यांनी पुरुष गटात आपापले सर्व सामने जिंकताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. (क्रीडा प्रतिनिधी)