सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची क्रीडा प्रबोधिनीत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 02:24 AM2020-02-22T02:24:59+5:302020-02-22T02:25:23+5:30
पाच राज्य स्पर्धेत राखले होते वर्चस्व; गळफास लावून संपविले आयुष्य
अकोला : राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेला नागपूरचा बॉक्सर प्रणव राष्ट्रपाल राऊत (वय १८) याने येथील लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावरील शासकीय क्रीडा प्रबोधिनीतील वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नागपुरात पोलीस लाईन टाकळी येथे राहणारा राष्ट्रीय बॉक्सर प्रणव हा काही वर्षांपासून क्रीडा प्रबोधिनीत बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत होता. तो येथे ११ व्या वर्गात शिक्षण घेत होता. राज्य स्पर्धेत पाच सुवर्णपदकांचा मानकरी असलेल्या प्रणवने जानेवारीमध्ये दिल्लीत राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. शुक्रवारी सकाळी प्रणवने क्रीडा प्रबोधिनीच्या होस्टेलमधील रूम क्रमांक ४ मध्ये गळफास घेतला. प्रणव खोलीतून बाहेर येत नसल्याने, त्याच्या मित्रांनी रूमचा दरवाजा ठोठावला; परंतु त्याने दरवाजा उघडला नाही. अखेर मित्रांनी दार तोडले आणि त्यांना प्रणव फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर क्रीडा अधिकाऱ्यांसह प्रशिक्षक सतीशचंंद्र भट्ट व मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वडील राष्ट्रपाल राऊत नागपूर शहर पोलीस दलात कर्मचारी आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करणार आहेत.
निराशेपोटी उचलले टोकाचे पाऊल
प्रणव गुरुवारपर्यंत व्यवस्थित होता. त्याचे बोलणे, वागणे अर्थात देहबोलीवरून तो तणावात नसल्याचे त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे. प्रणव चार वर्षांपूर्वी अकोला क्रीडा प्रबोधिनीत दाखल झाला होता. त्याने १४,
१७ व १९ वर्षीय वयोगटातील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले होते. यंदा औरंगाबाद येथे झालेल्या राज्य स्पर्धेत त्याने सुवर्णपदकही जिंकले होते.
जानेवारीमध्ये दिल्लीत झालेल्या स्पर्धेत त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्वही केले. दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्यानंतर रोहतकमध्ये २७ ते २९ जानेवारी या कालावधीत झालेल्या भारतीय संघ निवड चाचणीतही सहभाग नोंदवला होता. तेथे अपयश आल्यामुळेच प्रणवने निराशेपोटी हे टोकाचे पाऊल उचचले असावे, अशी क्रीडा क्षेत्रात चर्चा आहे.