टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारच- एम. सी. मेरीकोम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:59 PM2020-03-31T23:59:20+5:302020-04-01T06:30:43+5:30
सध्या तरी निवृत्तीचा विचार नसल्याचे दिले संकेत
- रोहित नाईक
मुंबई : ‘टोकियो ऑलिम्पिकसाठी आम्ही सर्वांनीच खूप मेहनत घेतली होती. पण आता ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असून आरोग्याच्या तुलनेत कोणतीही गोष्ट महत्त्वाची नसते. त्यामुळेच सध्या ऑलिम्पिक, सराव अशा गोष्टी सध्या दुय्यम बनल्या आहेत. ऑलिम्पिक सुवर्णपदक हे माझे सर्वात मोठे स्वप्न असून सर्व परिस्थिती सुरळीत झाल्या की मी पुन्हा एकदा यासाठी पूर्ण तयारी करेन,’ असा विश्वास भारताची दिग्गज मुष्टियोद्धा आणि सहावेळची विश्वविजेती एम. सी. मेरीकोम हिने ‘लोकमत’कडे व्यक्त केला. यासह तिने सध्यातरी आपला निवृत्तीबाबत कोणताही विचार नसल्याचे संकेतही दिले.
टोकियो आॅलिम्पिकमध्ये मेरीकोमकडून भारताला पदकाची मोठी आशा आहे. मात्र कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे यंदाची आॅलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी आयोजित करण्यात आल्यानंतर मेरीकोमच्या भविष्यावरही प्रश्न निर्माण झाले होते. कारण, यंदाची आॅलिम्पिक आपली अखेरची स्पर्धा असेल, असे मेरीकोमने याआधीच सांगितले होते. मात्र, आता तिने ‘लोकमत’शी संवाद साधताना, ‘आॅलिम्पिक सुवर्णपदकासाठी पुन्हा एकदा जोमाने तयारीला लागेल,’ असे सांगत आपल्या निवृत्तीच्या चर्चांना सध्यातरी पूर्णविराम दिला. लॉकडाऊनमुळे सध्या मेरीकोम आपल्या कुटुंबियांसोबत राहण्याचा आनंद घेत आहे.
आपल्या तयारीबाबत मेरीकोम म्हणाली की, ‘सध्या कोरोनामुळे स्थिती गंभीर बनली असून यामुळे खेळाला निश्चित पहिले प्राधान्य नाही. नक्कीच ओलिम्पिक सुवर्ण पदक माझे सर्वात मोठे स्वप्न आहे. एकदा का सर्व परिस्थिती सुधारली की, मी पुन्हा एकदा माझ्या तयारीला जोमाने सुरुवात करेन. प्रशिक्षक, संघटना आणि ‘साइ’च्या मार्गदर्शनाखाली मी योजना तयार करेन.’
२०१२ साली लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर समाधान मानावे लागलेल्या मेरीकोमची नजर आता सुवर्ण पदकावर आहे. मात्र
आता हे लक्ष्य गाठण्यासाठी तिला आणखी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. याविषयी मेरी कोम हिने म्हटले की, ‘नक्कीच माझ्या सर्वात मोठ्या स्वप्नपूर्तीसाठी मला एक वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. पण हे जवळपास जगातील सर्व खेळाडूंबाबत झाले असेल आणि त्याचे कारण एकसारखेच आहे. त्यामुळे सर्वचजण घेण्यात आलेल्या निर्णयाचा आदर करतील, अशी खात्री आहे. आता मला माझे लक्ष्य साधण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल आणि मी या आव्हानासाठी सज्ज आहे.’
माझी इच्छाशक्ती सर्वात मोठी ताकद !
बॉक्सिंग ग्लोव्ह्ज पाहिल्यानंतर मला नेहमी प्रेरणा मिळते असे सांगताना मेरीकोम म्हणाली की, ‘मी निर्धारीत केलेल लक्ष्य काय आहे आणि ते कसे मिळवायचे, हे मला ग्लोव्ह्जकडे बघितल्यावर नेहमी आठवते. शिवाय निर्धारीत लक्ष्य गाठण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कठोर मेहनत. मी ३७ वर्षांची असून ४ मुलांची आई आहे, पण माझी इच्छा माझी सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळेच जरी आॅलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलले गेले असले, तरी माझे स्वप्न पूर्ण करण्यात मला यश मिळेल असा विश्वास आहे.’
मेहनतीशिवाय काहीच शक्य नाही
मेरीकोमची उर्जा पाहून अनेकांना कायम प्रेरणा मिळते. याविषयी तिने सांगितले की, ‘कठोर सराव आणि अचूक डाएट यामुळेच मला हे शक्य होते. उर्जात्मक राहणे आपल्या कार्याविषयी कायम उत्साहित राहणे खूप महत्त्वाचे असते. कठोर मेहनतीशिवाय काहीच शक्य होणार नाही.’
आज देश सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत असून आपण एकत्रितपणे येऊन सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करायला हवा. मी माझ्या चाहत्यांसह सर्व देशवासियांना विनंती करते की सर्वांनी लॉकडाऊनचे आणि सरकारने दिलेल्या निर्देशांचे पूर्ण पालन करावे. विविध सरकारी विभाग आज आपल्या सुरक्षेसाठी झटत असून आपल्याला केवळ घरात बसून त्यांना कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी सहकार्य करायचे आहे. - एम. सी. मेरीकोम