राष्ट्रकुल टेबल टेनिस: साथियान, अर्चना यांचे मिश्र गटात सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 01:20 AM2019-07-22T01:20:02+5:302019-07-22T06:11:32+5:30
शरथ कमलचे आव्हान संपुष्टात
कटक : जी. साथियान-अर्चना कामत यांनी रविवारी पेंग यु इन कोइन-गोइ रुई झुआन यांचा ३-० असा धुव्वा उडवत १२व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीचे सुवर्ण पटकावले. त्याचवेळी आघाडीचा टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला.
या जेतेपदासह साथियान-अर्चना यांनी शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांच्या पराभवाचा वचपाही काढला. सिंगापूरच्या जोडीने उपांत्य फेरीत शरथा-श्रीजा यांना नमवले होते. तसेच पुरुष एकेरीत पेंगने शरथचे आव्हान संपुष्टात आणले होते.
के. पेंग यु इन कोईनने शरथला ७-११, ९-११, ११-८, ४-११, ११-९, ११-७, १२-१० अशा गेममध्ये पराभूत केले. शरथ-श्रीजा यांना पेंग व गोइ जोडीने १३-११, ८-११, ६-११, ११-८, ११-४ असे पराभूत केले.
अग्रमानांकित जी. साथियान व हरमीत देसाई यांनी उपांत्य फेरी गाठली. साथियानने नायजेरियाच्या बोडे अबिडोन याला ११-७, ११-८, ११-८, ११-६ असे नमवून आगेकूच केली. महिला एकेरीत आयका मुखर्जी, श्रीजा अकुला, मुधरिका पाटकर यांनी उपांत्य फेरी गाठली. या तिघींनीही भारतीय खेळाडूंनाच पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. मात्र दुसरीकडे, अर्चना कामतला इंग्लंडच्या अग्रमानांकित टिन टिन कडून १-४ असे पराभूत व्हावे लागले.