रिओतील सुवर्णही अंध धावपटूंपुढे फिके

By Admin | Published: September 14, 2016 06:13 AM2016-09-14T06:13:12+5:302016-09-14T06:13:12+5:30

येथे सुरु असलेल्या अपंगांच्या पॅरालिम्पिकमध्ये १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पहिल्या चार क्रमांकांवर आलेल्या अंध धावपटूंनी महिनाभरापूर्वी याच स्टेडियममध्ये १५०० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक

Gold in Rio is also the result of blind run | रिओतील सुवर्णही अंध धावपटूंपुढे फिके

रिओतील सुवर्णही अंध धावपटूंपुढे फिके

googlenewsNext

रिओ डी जानेरो : येथे सुरु असलेल्या अपंगांच्या पॅरालिम्पिकमध्ये १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पहिल्या चार क्रमांकांवर आलेल्या अंध धावपटूंनी महिनाभरापूर्वी याच स्टेडियममध्ये १५०० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक पटकाविणाऱ्या अमेरिकेच्या आॅलिम्पिकवीराहून अधिक वेगाने धावण्याची किमया करून सर्वांना थक्क केले. रिओ आॅलिम्पिकमधील सुवर्णपदकासाठी नोंदल्या गेलेल्या वेळेहून या चारही अंधांचा वेळ एवढा कमी होता की त्यांच्यापैकी चौथा आलेला रिओ आॅलिम्पिकमध्ये धावला असता तरी त्याने १५०० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक आरामात खिशात टाकले असते!
धडधाकट खेळाडूंच्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धा गेल्याच महिन्यांत संपल्या. त्यातील १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या मॅथ्यु सेंट्रोवित्झ (ज्यू.) याने ३ मिनिटे ५० सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळविले होते. त्याच स्टेडियममध्ये सोमवारी पॅरालिम्पिकमधील ‘टी ११’, ‘टी १२’ व ‘टी १३’ या गटांतील अंधांची १५०० मीटर धावण्याची शर्यत झाली. त्यात अब्देललतीफ बाका, तामिरु डेमिसे, हेन्री किरवा आणि फौआद बाका या पहिल्या चार अनुक्रमांनी आलेल्या धावपटूंनी हे अंतर सेंट्रोवित्झपेक्षा कमी वेळेत पार केले. यापैकी अब्देललतीफ आणि फौआद हे दोघे सख्खे भाऊ आहेत, हे आणखी एक वैशिष्ठ्य.
अल्जेरियाच्या अब्देललतीफ बाका याने ३ मिनिटे ४८.२९ सेकंदांत १५०० मीटरचे अंतर धावून सुवर्णपदक मिळवितानाच पॅरालिम्पिकमधील या शर्यतीचा नवा विश्वविक्रमही प्रस्थापित केला. रिओ आॅलिम्पिकचे सुवर्णपदक मिळविणाऱ्या सेंट्रोवित्झहून त्याने घेतलेला वेळ तब्बल १.७ सेकंदाने कमी होता. तामिरु डेमिसे (इथिओपिया) रौप्यपदकाचा (३:४८.४९ मिनिटे) तर केनियाचा हेन्री किरवा (३:४९.५९ मिनिटे) ब्रॉन्झपदकाचा मानकरी ठरला. फौआद बाका (३:४९.८४ मिनिटे) चौथा आला. या अंध धावपटूंना धावताना कोणतेही साधन वापरण्यास मज्जाव असतो, हेही लक्षात घ्यायला हवे.
जिद्द आणि कठोर परिश्रम या जोरावर कोणत्याही प्रकारच्या शारीरिक अपंगत्वावर मात करून उत्तुंग यशोशिखरालाही गवसणी घालता येते, असा स्फूर्तिदायक संदेश या शर्यतीतून जगभरातील केवळ अपंगांनाच नव्हे तर अव्यंग शरीरयष्टी लाभलेल्या लाखो खेळांडूंनाही मिळाला. दुर्दैवाने अपंगांच्या या स्पर्धांना नियमित आॅलिम्पिकसारखी प्रतिष्ठा व प्रसिद्धीचे वलय नाही. या स्पर्धांमधील विजेते खरंच आॅलिम्पिकमध्ये खेळले तर भल्याभल्यांना घाम फुटेल, याची खात्री या चौघांच्या यशावरून नक्कीच पटते.


१५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मोरक्कोच्या हिशाम अल ग्युरोज याने प्रस्थापित केलेला ३:२६ मिनिटांचा जागतिक विक्रम आजही अबाधित आहे. त्या तुलनेत रिओमध्ये मॅथ्यु सेंट्रोवित्झची ३.५० मिनिटांची धाव खूपच संथगती म्हणावी लागेल.
काहींच्या मते तो मुद्दाम हळू धावला. यात तथ्यही असेल. कारण रिओमध्ये पात्रता फेरीत याच सेंट्रोवित्झने ३:३९.३१ मिनिटांची वेळ नोंदविली होती.
पात्रता फेरीत त्याच्याहून जलद धावून पहिला आलेला (३:३८.३१ मिनिटे) चेक प्रजासत्ताकाचा जेकब होलुसा अंतिम शर्यतीत मात्र बराच मागे पडला होता.

Web Title: Gold in Rio is also the result of blind run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.