पॅरालिम्पिक: ‘गोल्डन बॉय’ सुमितचा विश्वविक्रम; नेमबाजीत अवनीचाही ‘सुवर्णवेध’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 08:21 AM2021-08-31T08:21:38+5:302021-08-31T08:21:53+5:30
झांझरिया,कथुनिया यांना रौप्य,सोमवारी जिंकली ५ पदके
टोकियो : पॅरालिम्पिकमध्ये सोमवारी भारतीय खेळाडूंनी सोमवारी पाच पदकांचा धडाका लावला. सुमित अंतिलने भालाफेकमध्ये एफ ६४ प्रकारात सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे. या कामगिरीसोबत सुमितने विश्वविक्रमही मोडला. प्रथमच सहभागी झालेल्या हरियाणातील सोनिपत येथील २३ वर्षांच्या सुमितने पाचव्या प्रयत्नांत ६८.५५ मीटर लांब भाला फेकून विश्वविक्रम आपल्या नावावर केला. २०१५ ला झालेल्या मोटरसायकल अपघातात सुमितने गुडघ्याच्या खालचा पायाचा भाग गमावला होता.
भालाफेकीतच अनुभवी देवेंद्र झांझरियाने एफ ४६ प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. ‘खेलरत्न’ने सन्मानित देवेंद्रचे पॅरालिम्पिकमधील हे तिसरे पदक ठरले. याच स्पर्धेत भारताचा सुंदरसिंग गुर्जर कांस्य पदकाचा मानकरी ठरला. थाळीफेकीत योगेश कथुनिया याने एफ ५६ प्रकारात रौप्यची कमाई केली. भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्य अशी सात पदके जिंकली असून पॅरालिम्पिकमध्ये देशाची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. याआधी २००४ च्या अथेन्स आणि २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताने प्रत्येकी ४-४ पदकांची कमाई केली होती. आतापर्यंत भारताने १४ पदके जिंकली असून अद्याप अनेक खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे.
रोख बक्षीसांचा वर्षाव
राजस्थान सरकारने सुवर्ण पदक विजेती अवनीसाठी ३ कोटी, तर रौप्य विजेत्या देवेंद्रसाठी २ कोटी, तसेच सुंदरसाठी १ कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. हरयाणा सरकारने सुवर्ण पटकावलेल्या सुमितसाठी ६ कोटी, तर रौप्य विजेत्या योगेशसाठी ४ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
अवनीचा सुवर्णवेध
१९ वर्षीय नेमबाज अवनी लेखराने नेमबाजीत दहा मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारी अवनी पहिली भारतीय महिला ठरली. तिने २४९.६ गुणांसह सुवर्ण निश्चित केले. अवनी पात्रता फेरीत सातव्या स्थानावर राहिली होती. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे, हे विशेष.
थाळीफेकपटू विनोद कुमारचे कांस्य काढून घेतले
पॅरालिम्पिकमध्ये सोमवारचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. भारताने आणखी पाच पदके जिंकली असतानाच थाळीफेकपटू विनोद कुमार याचे कांस्यपदक काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने चाहत्यांना धक्का बसला. एफ ५२ प्रकारात ४१ वर्षीय विनोद कुमार थाळीफेकत तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याने १९.९१ मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत आशियाई विक्रम रचला. कुमार यांना झालेला विकार हा पॅरालिम्पिकच्या नियमांमध्ये बसत नसल्याचे सांगत कांस्यपदक काढून घेण्यात आले.
विनोद कुमारच्या मांसपेशी सक्षम असल्याचे आयोजन समितीच्या वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. यानंतर कुमारला पदक नाकारण्यात आले. काल पुरुषांच्या एफ ५२ स्पर्धेत विनोद यांच्या अपंगत्व वर्गीकरणामुळे त्याचे पदक रोखण्यात आले होते. एफ ५२ स्पर्धा म्हणजे काय? एफ ५२ ही दिव्यांगांच्या खेळातील या श्रेणीमध्ये अशा खेळाडूंचा समावेश होतो, ज्यांच्या स्नायूंची क्षमता कमी असते, स्नायूंची हालचाल मंद असते, हाताला काहीतरी व्याधी किंवा आजार असतो किंवा पायाच्या लांबीत फरक असतो. या प्रकारातील खेळाडू व्हीलचेअरवर बसून स्पर्धेमध्ये सहभागी होतात.
आमच्या पॅरालिम्पिकपटूंनी देशासाठी पदके जिंकल्याचा आनंद आहे. सुमित, अवनी यांच्या सुवर्णांसह योगेश कथुनिया आणि देवेंद्र झझारिया यांनी रौप्य तसेच सुंदरसिंग गुर्जरने कांस्य जिंकल्याबद्दल अभिनंदन. प्रत्येक भारतीय तुमच्या यशाचा जल्लोष करीत आहे.
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
पंतप्रधान मोदी यांचा संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंशी फोनद्वारे संवाद साधला. रौप्य विजेत्या योगेश कथुरियाचे फोनवरुन अभिनंदन केले. यावेळी मोदी यांनी अवनीलाही शुभेच्छा दिल्या. विजयाचा आम्हाला अभिमान वाटत आहे, असे त्यांनी सांगितले. योगेशच्या आईचेही आभार मानले. योगेशनेही पंतप्रधान मोदींचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी देवेंद्र झांझरिया व सुंदर सिंह गुर्जर यांना शुभेच्छा दिल्या. देवेंद्रशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ‘तुम्ही महाराणा प्रतापांच्या भूमीतून आहात. तुम्ही भालाफेकीत चांगली कामगिरी करीत आहात’, अशा शुभेच्छा दिल्या.