भारतीय टेबल टेनिससाठी गोल्डन डे

By admin | Published: March 6, 2016 03:07 AM2016-03-06T03:07:24+5:302016-03-06T03:07:24+5:30

भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी इतिहास रचताना जागतिक टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या डिव्हिजनमध्ये गोल्डन कामगिरी करताना देशाचा गौरव वाढवला.

Golden Day for Indian Table Tennis | भारतीय टेबल टेनिससाठी गोल्डन डे

भारतीय टेबल टेनिससाठी गोल्डन डे

Next

क्वालालंपूर : भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी इतिहास रचताना जागतिक टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या डिव्हिजनमध्ये गोल्डन कामगिरी करताना देशाचा गौरव वाढवला.
भारतीय संघांनी २४ तासांच्या आतच नवीन इतिहास रचला. भारतीय महिला संघाने प्रथम लक्झमबर्गचा ३-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले आणि नंतर पुरुष संघाने शनिवारी ब्राझीलवर ३-२ असा विजय मिळविताना सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. या यशाबरोबरच भारतीय संघ चॅम्पियन्स डिव्हिजनसाठीदेखील पात्र ठरला.
भारतीय महिला संघ सर्वच सामने जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या पर्वातील आपल्या सर्वच्या सर्व आठही लढती जिंकल्या. पुरुष संघाला फक्त नायजेरियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
महिलांच्या फायनलमध्ये मौमा दास हिने डॅनियल कोंसब्रक हिचा ३-० असा पराभव केला. त्यानंतर मणिका बत्रा हिने टेसी गोंडरिंगर हिच्यावर ३-२, अशी मात करून भारताची आघाडी दुप्पट २-० अशी केली. के. शामिनी साराह डी नटे हिच्याविरुद्ध ०-३ अशी पराभूत झाली; परंतु मणिकाने डॅनियल हिचा ३-० असा पराभव करताना भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. मणिका आणि मौमा दास यांनी या विजयानंतर ‘हा आमच्यासाठी संस्मरणीय अनुभव आहे व तो आम्ही आयुष्यभर स्मरणात ठेवू,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात सौम्यजित घोष याला कॉलडॅरिनो याच्याकडून १३-१५, ४-११, ७-११ असा पराभवाचा सामना करावा लागला; परंतु हरमीत देसाईने काजुओ मत्सुमोतो याच्यावर ३-११, ११-८, ११-८, ८-११, ११-९ असा विजय मिळविताना भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. अँथनो अमलराज याला पुढील सामन्यात तियागो मोंटेरियोकडून ११-८, ७-११, ११-५, ९-११, ९-११ असा पराभवाचा सामना करावा लागला. अँथनी सौम्यजितने मत्सुमोतो याचा ११-६, १४-१२, ११-९ आणि हरमितने कॉलडॅरिनो याचा ४-११, ११-५, १५-१३, ११-६ असा धुव्वा उडवताना भारताला गोल्डन विजय मिळवून दिला. त्याआधी भारतीय पुरुष संघाने नायझेरियाचा उपांत्यपूर्व सामन्यात ३-२ असा पराभव केल्यानंतर त्याच दिवशी उपांत्य फेरीत इजिप्तचा ३-१ असा धुव्वा उडवताना अंतिम फेरी गाठली होती आणि याच दिवशी त्यांनी ब्राझीलचे आव्हान ३-२ असे मोडीत काढले. महिला संघाने सर्बियाचा ३-२ असा निसटता पराभव केल्यानंतर लक्झमबर्गला फायनलमध्ये ३-१ अशी धूळ चारली.

Web Title: Golden Day for Indian Table Tennis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.