'सोनेरी दिवस' सुशील कुमारचे 'गोल्डन कमबॅक', साक्षी मलिकनंही पटकावलं गोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 10:35 PM2017-12-17T22:35:58+5:302017-12-17T22:42:25+5:30
सुशील कुमार आणि साक्षी मलिकनं जोहान्सबर्ग येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे.
जोहान्सबर्ग : भारताचा स्टार मल्ल सुशील कुमार याने अपेक्षित कामगिरी करताना जोहान्सबर्ग येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदकास गवसणी घातली. दुसरीकडे, स्टार महिला मल्ल साक्षी मलिक हिनेही आपला लौकिक कायम राखताना सुवर्ण कमाई केली. यानिमित्ताने भारताच्या दोन्ही आॅलिम्पिक पदक विजेत्या मल्लांनी पुन्हा एकदा अभिमानाने तिरंगा फडकावला.
महिलांच्या फ्रीस्टाइल ६२ किलो वजनी गटामध्ये साक्षीने आपले वर्चस्व राखताना न्यूझीलंडच्या तायला तुअहिने फोर्ड हिला १३-२ असे सहजपणे लोळवत बाजी मारली. साक्षीच्या भक्कम पकडी आणि चपळ डावांपुढे फोर्डचा काहीच निभाव लागला नाही. साक्षीने केलेल्या काही माफक चुकांमुळे फोर्डला २ गुणांचे समाधान लाभले.
तत्पूर्वी, तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये पदार्पण केलेल्या सुशीलने ७४ किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाइलमध्ये न्यूझीलंडच्याच आकाश खुल्लरला चीतपट करत सुवर्ण पदकावर कब्जा केला. या जेतेपदासह सुशीलने दिमाखात आंतरराष्ट्रीय पुनरागमन केले. याआधी २०१४ साली ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पटकावल्यानंतर सुशीलचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक ठरले. विशेष म्हणजे याच गटात भारताच्या प्रवीण राणाने कांस्य पदक पटकावताना भारतीयांचा आनंद द्विगुणित केला.
यंद कोणत्याही विशेष लढतीविना राष्ट्रीय जेतेपद पटकावलेल्या सुशीलला उपांत्य सामन्यात प्रवीण राणाचे आव्हान मिळाले. प्रवीणनेच राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात माघार घेत सुशीलला सुवर्ण बहाल केले होते. त्यावरुन बराच वादही उफाळला होता. मात्र, यावेळी या दोघांना लढावे लागले आणि त्यात सुशीलने ५-४ अशी बाजी मारत अंतिम फेरी गाठली, तर प्रवीणला कांस्य पदकासाठी लढावे लागले. याआधी सुशीलने पहिल्या लढतीत कॅनडाच्या जसमीत सिंग फुलका याला मात दिली होती
It’s a very proud and emotional moment for me as I have returned to the mat on international level after a gap of 3years. I want to dedicate this Gold medal won in #Commonwealthwrestlingchampionship at #SouthAfrica to my guru and to my Nation. JaiHind🇮🇳
— Sushil Kumar (@WrestlerSushil) December 17, 2017
Got gold in commonwealth championship 🥇🇮🇳 South Africa 🇿🇦 pic.twitter.com/LNTox9PF2F
— Sakshi Malik (@SakshiMalik) December 17, 2017
#जयहिंद 🇮🇳 #Commonwealthwrestlin#SouthAfricapic.twitter.com/9YAgkzvoXC
— Sushil Kumar (@WrestlerSushil) December 17, 2017
तीन वर्षांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण जिंकण्यात यशस्वी ठरलो. मी माझ्या आई-वडिलांना, माझे गुरु पैलवान सतपालजी , अध्यात्मिक गुरु योगॠषी स्वामी रामदेव आणि प्रत्येक देशवासीयाला हे पदक समर्पित करतो. जय हिंद.
- सुशील कुमार