गोल्फादेवी संघाचा दबदबा
By admin | Published: May 8, 2017 03:52 AM2017-05-08T03:52:35+5:302017-05-08T03:52:35+5:30
एकतर्फी झालेल्या सामन्यात गोल्फादेवी संघाने एस.एस.जी संघाचा ५०-१५ असा धुव्वा उडवत नुकताच पार पडलेल्या कुमार गट कबड्डी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकतर्फी झालेल्या सामन्यात गोल्फादेवी संघाने एस.एस.जी संघाचा ५०-१५ असा धुव्वा उडवत नुकताच पार पडलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. गोल्फादेवीच्या शार्दुल हरचकरचा स्पर्धेतील ‘सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यासह यंदाच्या मोसमातील पाचवे विजेतेपद गोल्फादेवी संघाने आपल्या नावे केले आहे.
मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आदर्श नगर येथील वरळी स्पोटर््स क्लबच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या निर्णायक सामन्यात शार्दुल, धनंजय सरोज यांनी आक्रमक व खोलवर चढाया करुन आपले वर्चस्व निर्माण केले. त्याचप्रमाणे अनिकेत जठारच्या मजबूत पकडीमुळे एसएसजी संघाच्या अडचणीत वाढ झाली. गोल्फादेवी संघाने पकडी आणि चढाई या दोन्ही क्षेत्रात शानदार खेळाचे प्रदर्शन करत मध्यांतराला तीन लोणसह ३०-०५ अशी एकतर्फी आघाडी घेत स्पर्धेचा जेतेपदावर एकप्रकारे शिक्काच मारला. त्याचबरोबर या भल्यामोठ्या पिछाडीच्या दडपणाखाली आलेल्या एसएसजीच्या खेळाडूंनी नंतर पुनरागमाचे प्रयत्नही सोडल्याने गोल्फादेवीने सहज बाजी मारली.
फॉर्ममध्ये असलेल्या पंकज मोहिते आणि सर्वेश चाचे यांचे अपयश एसएसजीसाठी महागात पडले. यामुळे त्यांना एकूण चार लोणच्या नामुष्कीला सामोरे जात तब्बल ३५ गुणांच्या फरकाने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
दरम्यान स्पर्धेतील सर्वोत्तक चढाईपटू व सर्वोत्तम पकड या पुरस्कांरांवर अनुक्रमे पंकज मोहिते आणि सर्वेश चाचे या एसएसजीच्या खेळाडूंनी कब्जा केला.