गुड बाय दिएगो मॅरेडोना... साश्रृनयनांनी चाहत्यांनी दिला अखेरचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 03:32 AM2020-11-28T03:32:26+5:302020-11-28T03:33:10+5:30
साश्रृनयनांनी चाहत्यांनी दिला अखेरचा निरोप
ब्युनास आयर्स : महानायक दिएगो मॅरेडोनाला अखेरचा निरोप देण्यासाठी फुटबॉल चाहते हजारोंच्या संख्येने रस्त्यावर जमले. डोळ्याच्या कडा पाणावलेल्या व हातात अर्जेंटिनाचा राष्ट्रध्वज घेऊन फुटबॉलचे गीत गाणाऱ्या चाहत्यांच्या गर्दीला नियंत्रणात आणण्यास पोलिसांना बळाचा वापरही करावा लागला. मॅरेडोनाच्या पार्थिव शरीराचे अंतिम दर्शन सायंकाळी ६ वाजता बंद करण्यात आले. त्यामुळे त्याची एक झलक बघण्यासाठी आतूर असलेले चाहते उतावीळ झाले व कब्रस्तानाच्या दारावर तणाव निर्माण झाला होता.
जार्डिन बेल्ला विस्टा कब्रस्तानमध्ये एक खासगी धार्मिक कार्यक्रम व अंतिम संस्कारासाठी दोन डझन लोक उपस्थित होते. मॅरेडोनाला त्याचे आईवडील डालमा व दिएगो यांच्या जवळच्या कबरीत दफनविधी पार पडला. त्याच्या अंतिम प्रवासात चाहते फुटबॉलचे गीत गात होते तर काहींनी राष्ट्रध्वज अंगावर गुंडाळला होता. त्यांनी प्लाजा डे मायोपासून २० ब्लॉकच्या अंतरावर लांब रांग लावली. येथेच मॅरेडोनाच्या नेतृत्वाखाली १९८६ मध्ये विश्वकप जिंकल्यावर जल्लोष करण्यात आला होता. मॅरेडोनाच्या अंतिम प्रवासाच्या वेळी चाहते ‘दिएगोचा मृत्यू झाला नाही, दिएगो लोकांच्या हृदयात राहतो’ असे नारे लावत होते. अंतिम यात्रेदरम्यान गाडींच्या काफिल्यासह पोलीसही होते. ताबूत बघितल्यानंतर चाहत्यांचा शोक अनावर झाला. ते त्या ताबूतला आलिंगन देत शोक व्यक्त करीत होते.
मॅरेडोनाचे पार्थिव अर्जेंटिनाच्या राष्ट्रध्वजामध्ये व १० नंबरच्या जर्सीत गुंडाळले होते. बोका ज्युनियर्स क्लबपासून राष्ट्रीय संघापर्यंत त्याने १० नंबरचीच जर्सी घातली होती. त्याच्या मुली व कुटुंबातील नजिकच्या सदस्यांनी त्याला निरोप दिला. त्याची माजी पत्नी क्लाउडिया विलाफेर मॅरेडोनाच्या मुली डालमा व जियानिन्नासोबत आली होती. त्यानंतर त्याची आणखी एक माजी पत्नी वेरोनिका तिचा मुलगा डिएगुइटो फर्नांडोसोबत आली होती. त्यानंतर १९८६ विश्वकप विजेता संघातील सहकारी खेळाडू दाखल झाले. त्यात ऑस्कर रगेरीचा समावेश होता. अर्जेंटिनाचे अन्य फुटबॉलपटूही यावेळी उपस्थित होते.
सर्वप्रथम सकाळी राष्ट्रपती अलबर्टो फर्नांडेस यांनी त्याच्या ताबूतवर अर्जेंटिनोस ज्युनियर्स संघाची जर्सी ठेवली होती. मॅरेडोनाने येथूनच फुटबॉल प्रवासाची सुरुवात केली होती.
अंत्यदर्शनाच्यावेळी चाहत्यांचा राग अनावर
n पार्थिवाच्या अंतिम दर्शनाची वेळ कमी केल्यामुळे चाहत्यांचा राग अनावर झाला होता. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. चाहत्यांनी पोलिसांवर दगडफेक केली प्रत्युत्तरात पोलिसांनी रबराच्या गोळ्या चालविल्या.
n हिंसाचारमुळे अनेकांना दुखापत झाली व अटकही झाली. त्यामुळे मॅरेडोनाच्या कुटुंबाने सार्वजनिक दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ताबूत कारमध्ये ठेवण्यात आले. त्यावर मॅरेडोनाचे नाव लिहिले होते. मॅरेडोनाला अंतिम निरोप देण्यासाठी चाहते राष्ट्रपती भवनाच्या भिंतीवर चढले.