नशीब, मी अभ्यासात ढ होतो - पुलेला गोपीचंद
By Admin | Published: August 31, 2016 05:54 PM2016-08-31T17:54:50+5:302016-09-01T00:24:15+5:30
मी अभ्यासात हुशार नसल्यानं नशिबवान असल्याचं म्हटलं आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31- प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. मात्र रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणा-या सिंधूच्या मागे कोच गोपीचंद असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे गोपीचंद काहीसे चर्चेत आले होते. सायना आणि सिंधूला बॅडमिंटनचे धडे शिकवणारे कोच पुलेला गोपीचंद यांनी "मी अभ्यासात हुशार नसल्यानं नशिबवान असल्याचं म्हटलं आहे. मी आणि माझा भाऊ लहानपणापासून खेळात तरबेज होतो. मात्र भाऊ नशीबवान होता कारण तो अभ्यासात हुशार होता. भाऊ आयआयटी पास झाला आणि त्याचा खेळ सुटला," असंही यावेळी सांगितलं आहे.
मी मात्र इंजिनीअरिंगच्या परीक्षेत नापास झालो, त्याक्षणी मी खेळाला जवळ केलं असं गोपीचंदनं सांगितलं आहे. त्यावेळी खेळावर जास्त लक्ष्य केंद्रित केल्यानं मी चांगला खेळाडू झालो, कधी कधी मला वाटतं त्यादृष्टीने मी खूप नशिबवान आहे, असं 42 वर्षीय पुलेला गोपीचंद यांनी सांगितलं आहे. 2001मध्ये झालेल्या इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकून त्यांनी इतिहास रचला होता. मात्र त्यानंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारून स्वतःची प्रशिक्षण संस्था उघडली. यावेळी त्यांनी प्रशिक्षण संस्थेसाठी स्पॉन्सरशिप मागण्यासाठी गेलेल्या एका उच्चपदस्थ अधिका-याचीही गोष्ट सांगितली आहे.
ते म्हणाले, मी एका उच्च पदस्थ अधिका-याकडे स्पॉन्सरशिप मागायला गेलो होतो. त्याची कार्यालयाच्या बाहेर मी सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत वाट पाहायचो, असं सतत तीन दिवस सुरू होते. शेवटी तिस-या तो उच्च पदस्थ अधिकारी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की जगभरातील क्रीडाप्रेमींना बॅडमिंटन पाहण्यात रस नाही. त्यावेळी मी काहीसा उदास झालो. मात्र मी जोमानं माझं कार्य सुरूच ठेवलं आणि वेगवेगळ्या मार्गानं प्रशिक्षण संस्थेसाठी पैसा उभा केला. हा प्रवास खूप कठीण होता. मात्र मी डगमगलो नाही, अशा अनेक गोष्टी त्यांनी यावेळी सांगितल्या आहेत.