भारतीय संघाकडे प्रयोग करण्याची चांगली संधी
By admin | Published: June 28, 2017 12:43 AM2017-06-28T00:43:03+5:302017-06-28T00:43:03+5:30
वेस्ट इंडिज दौऱ्यावर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना भारताने जिंकला आहे, तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना भारताने जिंकला आहे, तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही. पण, माझ्यामते तो सामनाही भारताने जिंकला असता. कारण, वेस्ट इंडिजचा संघ खूप कमजोर आहे. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवली नाही. त्याशिवाय अफगाणिस्तान सारख्या नवख्या संघाविरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवण्यावर त्यांना समाधान मानावे लागले. त्यामुळे हा संघ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बिघडलेला दिसत आहे. कारण, त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, परंतु ती गुणवत्ता राष्ट्रीय संघासाठी खेळत नाहीए. ख्रिस गेल, सुनिल नरेन, द्वेन ब्रावो यांसारखे अनेक खेळाडू अनेक काळापासून वेस्ट इंडिजसाठी कधी खेळतात, तर कधी खेळत नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजचे क्रिकेट खूप बिघडले आहे.
काही लोकांचे मत आहे की, भारतीय क्रिकेट संघाला विंडिज दौऱ्यावर जाऊन काय मिळाले? परंतु, माझ्या मते भलेही विंडिज संघ कमजोर असेल, पण ही मालिका भारतीय संघासाठी, खेळाडूंसाठी आणि कर्णधारासाठी खूप महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट म्हणजे विश्वचषक २०१९ स्पर्धेसाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे प्रयोग करण्याची संधी आहे. जे खेळाडू संघाबाहेर बसलेत, त्यांना संधी देणे किंवा आणखी १०-१२ खेळाडू असे आहेत, जे भारतीय संघातून खेळू शकतात, अशा खेळाडूंना संधी देता येऊ शकते. त्यामुळे म्हणावा तसा मजबूत प्रतिस्पर्धी नसलेल्या संघाच्या दौऱ्यावर प्रयोग करण्याची उत्तम संधी भारताकडे आहे.
त्याशिवाय, आपण २०१९ विश्वचषक स्पर्धेसाठी तंदुरुस्त आहोत, हे सिध्द करण्यासाठी काही खेळाडूंवर दबाव असेल. राहुल द्रविडने तर युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांना इशारा देत नुकतीच एक प्रतिक्रीयाही दिली. त्यामुळे वाढत्या वयाचा या दिग्गज खेळाडूंवरही दबाव असेल. तसेच, अजिंक्य रहाणे सारख्या खेळाडूला संधी मिळाल्यानंतर त्याने शतक झळकावले. तो आता आघाडीच्या फळीमध्ये कोणाचीही जागा घेऊ शकतो. गोलंदाजीमध्ये दोन वर्षांपुर्वी मोहम्मद शमी आणि उमेश यादव प्रमुख गोलंदाज होते, पण आता ती जागा भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी घेतली आहे. त्यामुळे संघात अनेक उलटफेर होऊ शकतात. या सर्व घडामोडी लक्षात घेऊनच निवडकर्ते आणि कर्णधाराला पुढे जावं लागेल.
कर्णधाराच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास, ही मालिका कर्णधारासाठी अत्यंत महत्त्वाची असेल. गेल्या काही दिवसांमध्ये कर्णधार कोहलीचा माजी प्रशिक्षक कुंबळेसह जो काही वाद झाला, तो वाद मागे टाकून संघाला पुन्हा एकदा विजयी प्रवाहामध्ये आणण्याचे मुख्य लक्ष्य कोहलीपुढे असेल. यामुळे त्याचा आणि संघाचाही आत्मविश्वास वाढेल.