गुजरातचे ‘गोड बोला’

By admin | Published: January 15, 2017 04:40 AM2017-01-15T04:40:47+5:302017-01-15T04:40:47+5:30

कर्णधार पार्थिव पटेलने प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेल्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर गुजरातने शनिवारी संपलेल्या लढतीत ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या

'Good spoken' of Gujarat | गुजरातचे ‘गोड बोला’

गुजरातचे ‘गोड बोला’

Next

इंदूर : कर्णधार पार्थिव पटेलने प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेल्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर गुजरातने शनिवारी संपलेल्या लढतीत ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या मुंबईचा पाच गडी राखून पराभव केला आणि प्रथमच रणजी करंडकावर नाव कोरले. या विजयाबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.
मुंबईने गुजरातपुढे विजयासाठी ३१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पार्थिवच्या १४३ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर गुजरातने पाचव्या व अखेरच्या दिवशी पाच गडी राखून विजय साकारला आणि राष्ट्रीय चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. गुजरातने रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत सर्वांत मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य गाठण्याचा विक्रम नोंदविला. यापूर्वीचा विक्रम हैदराबादच्या नावावर होता. १९३८ मध्ये नवानगरविरुद्ध त्यांनी ९ बाद ३१० धावांची मजल मारत लक्ष्य गाठले होते.
गुजरातने ६६ वर्षांपूर्वी १९५०-५१ मध्ये अंतिम फेरी गाठली होती, पण त्यावेळी त्यांना होळकर (आता
मध्य प्रदेश) संघाविरुद्ध इंदूरमध्येच खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत १८९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. गुजरात रणजी चॅम्पियन ठरलेला १६ वा संघ आहे. गुजरातने २०१४-१५ मध्ये सैयद मुश्ताक अली टी-२० चषक आणि २०१५-१६ मध्ये विजय हजारे वन-डे करंडक पटकावला होता. आता तिन्ही स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावणारा गुजरात चौथा संघ ठरला आहे. गुजरातपूर्वी तामिळनाडू, बंगाल आणि उत्तर प्रदेश या संघांनी असा पराक्रम केलेला आहे. पार्थिव तिन्ही स्पर्धेत जेतेपद पटकावणारा पहिला कर्णधार ठरला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईचा हा केवळ पाचवा पराभव आहे. यापूर्वी त्यांना अखेरचा पराभव १९९०-९१ मध्ये हरियाणाविरुद्ध (२ धावांनी) स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मुंबईने ११ वेळा अंतिम फेरी गाठली. त्यापैकी १० वेळा त्यांनी जेतेपदाचा मान मिळवला. गुजरात आज मुंबईचा विजयरथ रोखण्यात यशस्वी ठरला.
कालच्या बिनबाद ४७ धावसंख्येवरून गुजरातने आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. याच धावसंख्येवर मोसमात सर्वाधिक १३१० धावा फटकावणारा सलामीवीर प्रियांक पांचाळ (३४) बाद झाला. पांचाळला बलविंदर संधूने (२-१०१) तंबूचा मार्ग दाखवला. संधूने त्यानंतर नवा फलंदाज भार्गव मेराईला (२) यालाही अधिक काळ टिकण्याची संधी दिली नाही. समित गोहल (२१) बाद झाल्यानंतर गुजरातची ३ बाद ८९ अशी अवस्था झाली. त्यानंतर पार्थिवने मनप्रीत जुनेजाच्या (५४) साथीने चौथ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी करीत गुजरातच्या विजयाचा मार्ग सुकर केला. मनप्रीतला अखिल हेरवाडकरने बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. रुजुल भटने (नाबाद २७) पार्थिवला चांगली साथ दिली. भट केवळ एक धावेवर असताना तारेने त्याचा सोपा झेल सोडला होता. त्यावेळी चेंडू यष्टिरक्षकाचे मागे असलेल्या हेल्मेटला लागला. त्यामुळे मुंबईला पाच पेनल्टी धावा गमवाव्या लागल्या. भट त्यानंतरही दोनदा सुदैवी ठरला.
दरम्यान, सामनावीर पार्थिव संधूच्या गोलंदाजीवर तीन चौकार ठोकत शतकासमीप पोहोचला. हेरवादकरच्या गोलंदाजीवर दोन धावा वसूल करीत त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले २५ वे शतक पूर्ण केले. (वृत्तसंस्था)

धावफलक...
मुंबई (पहिला डाव) : ८३.५ षटकांत सर्वबाद २२८ धावा.
गुजरात (पहिला डाव) : १०४.३ षटकांत सर्वबाद ३२८ धावा.
मुंबई (दुसरा डाव) १३७.१ षटकांत सर्वबाद ४११ धावा.
गुजरात (दुसरा डाव) : समित गोहेल झे. तारे गो. नायर २१, प्रियांक पांचाळ झे. यादव गो. संधू ३४, बीएच. मेराई त्रि. गो. संधू ०२, पार्थिव पटेल झे. व गो. ठाकूर १४३, मनप्रीत जुनेजा झे. तारे गो. हेरवादकर ५४, रुजुल भट नाबाद २७, चिराग गांधी नाबाद ११.
अवांतर - २१. एकूण : ८९.५ षटकांत ५ बाद ३१३ धावा.
बाद क्रम : १-४७, २-५१, ३-८९, ४-२०५, ५-२९९. गोलंदाजी : शार्दुल ठाकूर २२.५-४-९०-१; बलविंदर संधू २४-४-१०१-२; विजय गोहिल १५-४-४६-०; अभिषेक नायर १५-४-३१-१, व्हीव्ही. दाभोळकर ४-०-१५-०, हेरवाडकर ९-१-१७-१.

Web Title: 'Good spoken' of Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.