अलविदा ग्लास्गो, आता भेट गोल्ड कोस्टमध्ये !
By admin | Published: August 4, 2014 03:03 AM2014-08-04T03:03:30+5:302014-08-04T03:03:30+5:30
स्कॉटलंडमधील सर्वांत मोठे शहर असलेल्या ग्लास्गोमधील २० व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या ११ दिवसांच्या यशस्वी आयोजनाची आज, रविवारी शानदार समारंभात सांगता झाली.
ग्लास्गो : स्कॉटलंडमधील सर्वांत मोठे शहर असलेल्या ग्लास्गोमधील २० व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या ११ दिवसांच्या यशस्वी आयोजनाची आज, रविवारी शानदार समारंभात सांगता झाली. आता खेळाडूंना २०१८ मध्ये आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये होणाऱ्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. २३ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत ग्लास्गोमध्ये आयोजित
२० व्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७१ देशांच्या ४९४७ अॅथलिट्सनी २६१ सुवर्णपदकांसाठी झुंज दिली. इंग्लंडने २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आॅस्ट्रेलियाला धक्का देत पदकतालिकेत अव्वल स्थान पटकाविले.
पाचव्या स्थानावरील भारताच्या खात्यावर १५ सुवर्णपदकांसह एकूण ६४ पदकांची नोंद आहे. यावेळी एकूण ३७ देशांनी पदकतालिकेमध्ये स्थान मिळविले.
या स्पर्धेतील अखेरच्या शर्यतीत पुरुषांच्या सायकलिंग रोड रेसमध्ये वेल्सच्या गॅरेंट थॉमसने सुवर्ण जिंकले, तर महिला विभागात हा मान इंग्लंडच्या लिजी आर्मिटस्टेडने मिळविला. आता पुढील स्पर्धा आॅस्ट्रेलियामध्ये होणार आहे. २०१८ मध्ये
४ ते १५ एप्रिल या कालावधीत गोल्ड कोस्ट शहरात २१ वी राष्ट्रकुल स्पर्धा होईल. (वृत्तसंस्था)