मायकल क्लार्कचा 'वनडे'ला अलविदा
By admin | Published: March 28, 2015 09:08 AM2015-03-28T09:08:40+5:302015-03-28T09:21:43+5:30
ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर वनडे क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २८ - विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी अवघ्या काही तासांवर आलेली असतानाच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे आणि त्याचे कारण आहे कर्णधार मायकेल क्लार्कचा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय. उद्या (रविवार) पार पडणा-या विषश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर मायकेल क्लार्क वनडे क्रिकेटला अलविदा करणार आहे. खुद्द क्लार्कनेच ही घोषण केली.
'उद्या माझा शेवटचा वनडे सामना असेल. याबाबत मी माझे प्रशिक्षक आणि संघातील सहका-यांशी चर्चा केली आहे. ऑस्ट्रेलियातर्फे खेळायला मिळालं हे मी माझं भाग्य मानतो. पुढील विश्वचषकापर्यंत मी शारिरीकदृष्ट्या फिट असेन याची खात्री नाही, त्यामुळे निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे' असे सांगत क्लार्कने त्याच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
३३ वर्षीय मायकेल क्लार्कने २००३ साली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सूरूवात केली असून आत्तापर्यंत त्याने २४४ वनडे सामने खेळले आहेत. चार वर्षांपूर्वी त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र गेल्या काही काळापासून तो पाठीच्या दुखण्याने त्रस्त असून त्यामुळे भारताविरुद्धच्या कसोटीत मालिकेतही त्याला खेळता आले नव्हते. मात्र योग्य ते उपचार आणि परीश्रम घेऊन तो हा वर्ल्डकप खेळण्यास सज्ज झाला होता. पण त्या दुखण्याने पुन्हा उचल खाल्ल्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मायकेल क्लार्कची वनडे कारकीर्द
वनडे सामने : २४४
धावा : ७९०७
शतके : ८
अर्धशतक : ५७
सर्वोच्च धावसंख्या : १३०