गुडबाय रिओ...
By admin | Published: August 23, 2016 04:26 AM2016-08-23T04:26:29+5:302016-08-23T04:26:29+5:30
क्रीडा महाशक्ती कोण... सर्वोत्तम खेळाडू कोण... या प्रश्नांचे उत्तर देत १६ दिवस रंगलेल्या रिओ आॅलिम्पिकचा रविवारी रंगतदार समारंभात समारोप झाला.
शिवाजी गोरे
रिओ : क्रीडा महाशक्ती कोण... सर्वोत्तम खेळाडू कोण... या प्रश्नांचे उत्तर देत १६ दिवस रंगलेल्या रिओ आॅलिम्पिकचा रविवारी रंगतदार समारंभात समारोप झाला. या क्रीडा महाकुंभात सहभागी झालेल्या जगातील दिग्गज खेळाडूंना निरोप देण्यासाठी वरुण राजानेही हजेरी लावली आणि या समारोप सोहळ्याला भावनेची वेगळी किनार प्रदान केली. गुडबाय रिओ... असे भाव खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होते. पावसाच्या उपस्थितीत रिओमध्ये रंगतदार सामारोप सोहळ्यात ब्राझीलच्या या शहराने जगातील हजारो खेळाडूंचा भावनिक निरोप घेतला. यासह ३१ व्या आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी स्पर्धेच्या समारोपाची घोषणा केली. त्यामुळे १६ दिवस रंगलेल्या या क्रीडा महाकुंभाचा अधिकृत शेवट झाला. त्यात ४२ क्रीडा प्रकारात २०५ देशांचे ११ हजारपेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते.
गर्दीने फुललेल्या ऐतिहासिक माराकाना स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट सुरू असताना बाक म्हणाले,‘मी ३१ व्या आॅलिम्पिक खेळाच्या समारोपाची घोषणा करीत आहे. पंरपरेचे पालन करताना जगभरातील युवांना चार वर्षांनंतर जपानच्या टोकियोमध्ये होणाऱ्या ३२ व्या आॅलिम्पिकच्या जल्लोषात सहभागी होण्याचा आग्रह करीत आहे.’
जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमात एका छोट्या व प्रभावी भागात ‘सी यू इन टोकियो’ परफॉर्मंसदरम्यान व्यासपीठावर प्रवेश केला.
स्पर्धेनंतर खेळाडूंनी थंड हवा आणि पावसाच्या हजेरीनंतरही कार्यक्रमाचा आनंद घेतला. तीन तासांच्या या समारंभादरम्यान सातत्याने पाऊस सुरू होता, पण खेळाडूंच्या जल्लोषावर त्याचा काही प्रभाव जाणवला नाही. खेळाडू रेनकोटसह सहभागी झाले. त्यातील अनेक खेळाडू गात होते तर काही नृत्याचा आनंद घेत होते. अनेक खेळाडू सेल्फी घेत असल्याचे दृश्य बघायला मिळाले.
आतषबाजीसह १३ भागात या समारोप समारंभाची सुरुवात झाली. त्यात ‘जगत पिता’ मानल्या जाणाऱ्या सांतोस ड्यूमोंट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर रिओचे सांबा आयकॉन मार्टिन्हो डा सिल्व्हा यांनी आपल्या तीन मुलींसह ‘कारिनहोसो’वर सोलो परफॉर्मंस सादर केला. ब्राझीलचे २६ राज्य व एक संघ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २७ बालकांनी ब्राझीलचे राष्ट्रगीत गायले.
आॅलिम्पिकचे खरे नायक ठरलेल्या शरणार्थी आॅलिम्पिक पथकासह २०७ संघांच्या खेळाडूंनी एकसाथ स्टेडियममध्ये प्रवेश केला आणि एकता व मित्रत्वाचा संदेश दिला. त्यानंतर रिओतील महत्त्वाच्या क्षणांचा दोन मिनिटांचा व्हिडिओ दाखविण्यात आला. त्यानंतर अखेरची स्पर्धा पुरुष मॅरेथॉनचा पदक वितरण समारंभ दाखविण्यात आला. टोकियो २०२० साठी ११ मिनिट ४५ सेकंदाचा कार्यक्रम समर्पित करण्यात आला. त्यात जपानने आभार व्यक्त केले आणि साहस, प्रतिबद्धता याचे प्रदर्शन करताना चार वर्षांच्या कालावधीत यापेक्षा अधिक यश मिळवता येईल, असा आशावादी संदेश देणारा कार्यक्रम सादर केला.