गोपीचंद यांनी चुकीचे काम केले नाही : विमल कुमार
By admin | Published: July 10, 2015 01:52 AM2015-07-10T01:52:20+5:302015-07-10T01:52:20+5:30
बॅडमिंटनमधील भारताची आघाडीची महिला दुहेरीची जोडी ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा यांनी राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांच्यावर केलेल्या पक्षपातीपणाच्या आरोपाचे
बंगळुरू : बॅडमिंटनमधील भारताची आघाडीची महिला दुहेरीची जोडी ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा यांनी राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांच्यावर केलेल्या पक्षपातीपणाच्या आरोपाचे माजी प्रशिक्षक विमल कुमार यांनी खंडन करताना सांगितले, की गोपीचंद यांनी कधीही चुकीचे काम केले नाही. तसेच, त्यांना असाही विश्वास आहे, की क्रीडा मंत्रालय भारताच्या या अव्वल दुहेरी जोडीला लवकरच ‘टॉप’ उपक्रमामध्ये सहभागी करून घेईल.
ज्वाला-अश्विनी यांनी गोपीचंद यांच्यावर पक्षपात केल्याचा आरोप करून नव्या वादाला तोंड फोडले होते. यावर विमल यांनी सांगितले, की गोपीचंद यांनी कधीही कोणत्याही खेळाडूंमध्ये भेदभाव केला नाही. त्यांनी नेहमीच खेळाला प्राधान्य दिले. ज्वाला-अश्विनी यांना ‘टॉप’ उपक्रमात सहभागी करून घेतल्यास त्याचा फायदा निश्चितच देशाला होईल.
सायना नेहवालला प्रशिक्षण देत असलेले विमल यांनी पुढे सांगितले, की जर खेळाडू चांगल्या कामगिरीच्या जोरावर अव्वल १३ क्रमांकांत येत असतील, तरच त्यांचा विचार या उपक्रमासाठी होऊ शकतो. त्याचप्रमाणे आॅलिम्पिक क्वालिफिकेशनसाठी दुहेरी जोडीवर विशेष लक्ष देणे जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक वादांमध्ये गुंतून राहण्यापेक्षा पुढील एका वर्षासाठी एखाद्या तज्ज्ञाने संघासोबत उपस्थित राहणे योग्य होईल, असेही विमल म्हणाले. (वृत्तसंस्था)