ठरलं! टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी कुंबळे आणि सेहवागमध्ये चुरस
By admin | Published: June 1, 2017 07:12 PM2017-06-01T19:12:32+5:302017-06-01T19:22:15+5:30
कुंबळे आणि सेहवागसह टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत दिग्गजांची नावे समोर आली आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठीच्या शर्यतीत असणाऱ्या चेहऱ्यांची नावे समोर आली आहेत. एएनआयने बीसीसीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार टॉम मुडी, वीरेंद्र सेहगाव, लालचंद राजपूत, डोडा गणेश, रिचर्ड पायबस आणि अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. याबद्दल बीसीसीआयकडून अद्यापपर्यंत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी 31 तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची सल्लागार समिती इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार नि:पक्ष तसेच पारदर्शक प्रक्रियेसाठी प्रशासकांच्या समितीचा एक प्रतिनिधी क्रिकेट सल्लागार समितीच्या कामावर नजर ठेवणे गरजेचे आहे. सध्याचे कोच कुंबळे यांना थेट मुलाखत देण्याची मुभा देण्यात आली आहे.
मात्र, काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सेहवागला मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची विनंती केली होती. त्यामुळे प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असणाऱ्या अनिल कुंबळे यांना मुदतवाढ मिळणार नसल्याचे जाहीर केले होते. कुंबळे यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कालावधी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे.