‘गौती’संग जोडी जमली!
By admin | Published: April 27, 2017 12:59 AM2017-04-27T00:59:35+5:302017-04-27T06:20:06+5:30
प्रतिस्पर्धी संघांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरणारी जोडी म्हणून गौतम गंभीर-रॉबिन उथप्पाकडे पाहिले जात आहे. या जोडीने पुण्यातही कहर केला.
सचिन कोरडे / ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 27 - प्रतिस्पर्धी संघांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरणारी जोडी म्हणून गौतम गंभीर-रॉबिन उथप्पाकडे पाहिले जात आहे. या जोडीने पुण्यातही कहर केला.नरेन बाद झाल्यानंतर या जोडीने पुण्याची गोलंदाजी फोडून काढली. रायझिंग सुपरजायंटचा ७ गडी अणि ११ चेंडू शिल्लक ठेवत कोलकाता नाईट रायडर्सने सहज पराभव केला. या विजयानंतर मुंबईला मागे टाकत ते ‘टॉप’वर पोहचले. कोलकात्याचा हा धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठा दुसरा विजय होता. याआधी, त्यांनी गुजरात लायन्सच्या १८४ धावांचे आव्हान एकही गडी न गमावता गाठले होते. रॉबिनने आज सामनावीरचा मान मिळवला. त्याने अवघ्या २६ चेंडूंत आपले अर्धशतक झळकावले. ४७ चेंडूंत ७ चौकार आणि ६ षटकार ठोकत त्याने ८७ धावा फटकारल्या.
रायझिंग सुपरजायंट पुण्याने दिलेल्या १८२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सुनील नरेन व कर्णधार गौतम गंभीर यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पावित्रा घेतला. बिग बॅशमध्ये सलामीला येत यश संपादन केलेल्या वेस्ट इंडिजचा गोलंदाज नरेन याने नेहमीप्रमाणे आक्रमक फटकेबाजी केली खरी मात्र त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्याने तीन चौकारांच्या मदतीने ११ चेंडूत १६ धावा केल्या. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात ठाकूरच्या थेट फेकीवर तो धावबाद झाला. त्यानंतर प्रेक्षकांना खरी फलंदाजी पाहायला मिळाली. त्याला मिळालेली जीवदान पुण्यासाठी महागडे ठरले. इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर त्याचा सोपा झेल जयदेव उनाडकटकडून सुटला. यावेळी तो अवघ्या १२ धावांवर होता. त्यानंतर मात्र, त्याने पुण्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. उथप्पाने मैदानाच्या चारही बाजूला नेत्रदीपक फटके मारले. दुसऱ्या बाजूने
कर्णधार गौतम गंभीरने सावध फलंदाजी करीत उथप्पाला साथ दिली. त्यानेही ३५ चेंडूत पाच चौकार व एका षटकाराच्या साह्याने अर्धशतक झळकावले. उथप्पाने ४६ चेंडूंत सहा षटकार व सात चौकारांच्या साह्याने ८७ धावा केल्या. जिंकण्यासाठी अवघ्या पाच धावा आवश्यक असताना उनाडकटच्या चेंडूवर तो बाद झाला. मात्र तोपर्यंत या जोडीने विजयाला उंबरठ्यावर आणले होते. गंभीरने ४६ चेंडूत एक षटकार व सहा चौकारांच्या साह्याने ६२ धावा केल्या. त्यांनतर आलेल्या ब्राव्हो व मनीष पांडे यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.