गौडा, थिंगालीयाला हिरवा कंदील
By admin | Published: July 5, 2017 01:43 AM2017-07-05T01:43:05+5:302017-07-05T01:43:05+5:30
गत चॅम्पियन विकास गौडाची गुरुवारपासून प्रारंभ होत असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याबाबतची
भुवनेश्वर : गत चॅम्पियन विकास गौडाची गुरुवारपासून प्रारंभ होत असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याबाबतची अनिश्चितता आज संपली. राष्ट्रीय महासंघाने प्रदीर्घ चर्चेनंतर अखेरच्या क्षणी गौडाच्या नावाला मंजुरी दिली. स्पर्धेचे आयोजन स्थळ असलेल्या कलिंग स्टेडियममध्ये चाचणी देणारा महाराष्ट्राचा धावपटू सिद्धांत थिंगालीया याचाही या स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला. भारत या स्पर्धेचे यजमानपद तिसऱ्यांदा भूषवित आहे.
बुधवारी ३४ वर्षांचा होणाऱ्या गौडाला ५७.७९ मीटर थाळीफेक करता आली. काही राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मते ही कामगिरी पदकाच्या शर्यतीची नाही.
अमेरिकेत राहात असलेला गौडा आता सुवर्णपदकाची हॅट््ट्रिक नोंदविण्याच्या उद्देशाने स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्याने पुणे येथे २०१३ मध्ये ६४.९० मीटर थाळीफेक करीत सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. चीनमधील वूहान येथे यापूर्वी झालेल्या स्पर्धेत त्याने ६२.०३ मीटरचे अंतर गाठताना सुवर्णपदक पटकावले होते.
गौडाने २००५ मध्ये कोरियातील इंचियोन व २०११ मध्ये जपानमधील कोबे येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले होते.
एएफआयने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,‘राष्ट्रीय विक्रमवीर विकास गौडा आणि सिद्धांत थिंगाल्या यांच्यासह चाचणीसाठी आमंत्रित करण्यात आलेल्या खेळाडूंना कलिंग स्टेडियममध्ये होणाऱ्या २२ व्या आशियाई अॅथ्लेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.’
लांबउडीपटू सिद्धांत मोहन नाईक व नयना जेम्स यांच्याव्यतिरिक्त तिहेरी उडीपटू कार्तिक उन्नीकृष्णन व जायलिन एम. लोबो यांना शनिवारी झालेल्या चाचणीनंतर स्पर्धेत सहभागी होण्यास मंजुरी देण्यात आली. यजमान भारताचे या स्पर्धेत ९५ सदस्यांचे पथक सहभागी होत आहे. त्यात ४६ महिला खेळाडूंचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)