सिंधूच्या विनंतीनंतर सरकारची उपकरण विकत घेण्यास मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 05:43 AM2021-07-03T05:43:27+5:302021-07-03T05:44:21+5:30
भारतीय क्रीडा प्राधिकरणने (साई) म्हटले की, २०१६ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता खेळाडूने या उपकरणाची मागणी केल्यानंतर २४ तासात हे उपकरण विकत घेण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे
दिल्ली : विश्व चॅम्पियन पी.व्ही. सिंधूच्या विनंतीनंतर सरकारने एक अत्याधुनिक ‘रिकव्हरी’ उपकरण विकत घेण्यास मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे या भारतीय बॅडमिंटनपटूला आगामी टोकियो ऑलिम्पिकपूर्वी शारीरिक रूपाने फिट राहण्यास मदत मिळेल.
भारतीय क्रीडा प्राधिकरणने (साई) म्हटले की, २०१६ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता खेळाडूने या उपकरणाची मागणी केल्यानंतर २४ तासात हे उपकरण विकत घेण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. दरम्यान, साईने या उपकरणाच्या किमतीचा मात्र उल्लेख केलेला नाही. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांच्या दावेदारांमध्ये सामील सिंधू यामुळे खूश होती. हे विशेष प्रकारचे उपकरण असून, त्यामुळे खेळाडूला खेळासाठी फिट ठेवण्यास मदत होते. त्यामुळे खेळाडूंच्या वेदना, सूज व स्नायूचा ताण कमी करण्यास मदत होते. त्यात बर्फाच्या पाण्याचा वापर होतो. प्रशासनाने उपकरण खरेदी करण्यास मंजुरी प्रदान केल्यानंतर सिंधू म्हणाली, ‘मी खूश आहे. प्रदीर्घ सराव सत्रानंतर किंवा सामन्यानंतर मला मदत होईल.’