विश्वचषकातील सहभागासाठी सरकारचा आदेश पाळू : शहरयार
By admin | Published: December 18, 2015 03:10 AM2015-12-18T03:10:54+5:302015-12-18T03:10:54+5:30
भारताच्या यजमानपदाखाली पुढील वर्षी आयोजित टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघ पाठवायचा किंवा नाही याचा निर्णय पाक सरकार घेईल. आम्ही केवळ सरकारचा आदेश मानू, अशी प्रतिक्रिया
नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली पुढील वर्षी आयोजित टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघ पाठवायचा किंवा नाही याचा निर्णय पाक सरकार घेईल. आम्ही केवळ सरकारचा आदेश मानू, अशी प्रतिक्रिया पीसीबी प्रमुख शहरयार खान यांनी दिली आहे.
ते म्हणाले, ‘टी-२० ही आयसीसीची स्पर्धा आहे. आम्हाला त्या स्पर्धेत खेळणे अनिवार्य असेल. या स्पर्धेबद्दल सरकारला माहिती दिली आहे. तरीही पाक सरकार जे ठरवेल ते धोरण अवलंबणे पीसीबीसाठी क्रमप्राप्त असेल. भारतात खेळणार किंवा नाही या प्रश्नाचे होय अथवा नाही, असे उत्तर देण्याच्या स्थितीत मी सध्या नाही. आम्ही सरकारचा निर्णय आणि सल्ला मानण्यास बाध्य आहोत. भारत-पाक मालिका होत नसल्यामुळे माझी काही वेगळी भावना झाली आहे, असे मानू नये. विश्वचषक ही वेगळी स्पर्धा असल्याने त्या स्पर्धेविषयी स्वतंत्र विचार व्हायला हवा.’
भारत-पाक द्विपक्षीय मालिका ही बीसीसीआयकडून प्रस्तावित असल्याने त्यांनीच ती रद्द करावी. आमचे काहीही देणे-घेणे नाही, असे शहरयार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. (वृत्तसंस्था)