पाकसोबत न खेळण्याची सरकारची भूमिका योग्यच - व्हीव्हीएस लक्ष्मण
By admin | Published: May 31, 2017 07:45 PM2017-05-31T19:45:19+5:302017-05-31T19:45:19+5:30
पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट मालिका न खेळण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे माजी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने स्वागत केले आहे. आता हा खेळाशी संबंधित
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 31 - पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट मालिका न खेळण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे माजी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने स्वागत केले आहे. आता हा खेळाशी संबंधित मुद्दा राहिलेला नाही, असेही लक्ष्मण म्हणाला.
पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण म्हणाला, ‘मी नेहमी पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा आनंद घेतला आहे. तथापि, सरकार देशहितासाठी जो निर्णय घेते त्याचा सन्मान करणे महत्त्वपूर्ण आहे. हा खेळाशी संबंधित विषय आहे, असे मला वाटत नाही.’
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ जून रोजी भारत-पाक यांच्यात होणा-या लढतीविषयी लक्ष्मण म्हणाला, ‘पाकिस्तान संघ चांगला आहे. पण भारताने ताकदीनिशी खेळ केल्यास भारत हा सामना सहज जिंकेल. भारत-पाक यांच्यातील कुठलाही सामना रोमहर्षक होतो. हा साममनादेखील बर्मिंघम येथे खच्चून भरलेल्या मैदानावर खेळला जाईल. भारताने क्षमतानुरूप खेळ केल्यास हा सामना जिंकणे कठीण जाणार नाही, असा मला ठाम विश्वास आहे.’
आमचे फलंदाज उत्तम फॉर्ममध्ये आहेत. शिखर धवनने दोन्ही सामन्यात जी खेळी केली त्यामुळे मी फार प्रभावित झालो. दिनेश कार्तिकने बांगला देशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. चॅम्पियन्सच्या दोन सराव सामन्यातील यशस्वी कामगिरीच्या बळावर भारतीय संघ जेतेपदाचा बाचाव करेल, असेही आपले मत असल्याचे लक्ष्मणने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. कोहली-कुंबळे यांच्यातील मतभेदाबाबत सवाल करताच लक्ष्मणने अशा गोष्टींचे उत्तर देण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही, अशी प्रतिक्रिया दिली.