गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपालांच्या हस्ते खेळाडूंचा होणार सन्मान - विनोद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 04:03 PM2019-02-13T16:03:30+5:302019-02-13T16:04:05+5:30
रविवारी १७ फेब्रुवारी २०१८ रोजी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
मुंबई : क्रीडामंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (२०१७-१८) ची घोषणा केली. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन पुरस्कार हा मलखांब क्षेत्रात प्रशिक्षण देणारे उदय देशपांडे यांना घोषित झाला आहे तर शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार साताऱ्याच्या प्रियंका मंगेश मोहिते (गिर्यारोहण) यांना घोषित झाला आहे. श्री. विनोद तावडे यांनी आज घोषित केलेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये आर्चरी, ॲथलॅटिक्स, ट्रायथलॉन, वुशु, स्केटिंग, हॅण्डबॉल, जलतरण, कॅरम, जिम्नॅस्टीक, टेबल टेनिस, तलवार बाजी, बॅडमिंटन, बॉक्सींग, रोईंग, शुटींग, बिलियर्डस ॲण्ड स्नूकर, पॉवर लिफ्टील, वेट लिफ्टींग, मलखांब, आट्यापाट्या, कबड्डी, खोखो, कुस्ती, बुध्दीबळ, लॉन टेनिस, हॉलीबॉल, सायकलींग, स्क्वॅश, क्रिकेट, हॉकी या विभागातील ५५ खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे २०१७-१८ च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक/कार्यकर्ते या विभागात ७ पुरस्कारांचा तर एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू यामध्ये ९ पुरस्कारांचा समावेश आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार १५ जणांना घोषित करण्यात आला. येत्या रविवारी १७ फेब्रुवारी २०१८ रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या या समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
पुरस्काराच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली असून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी तीन लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, ब्लेझर असे देण्यात येईल. तर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, ब्लेझर असे आहे.
शिवछत्रपती पुरस्कारांच्या निवडीत होणारे वाद टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणून योग्य त्या खेळाडू-संघटक-मार्गदर्शक यांची निवड केली असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात असल्याचे क्रीडा मंत्री श्री. तावडे यांनी पुरस्कांची घोषणा करताना पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार निवड समितीमध्ये क्रीडा मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शालेय शिक्षण आयुक्त यांच्यासह पदमश्री धनराज पिल्ले, पदमश्री प्रभाकर वैद्य, अर्जुन पुरस्कारार्थी रचिता मिस्त्री, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी प्रदिप गंधे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रतिनिधी जय कवळी, पॅरा ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रतिनिधी राजाराम घाग, अर्जुन पुरस्कारार्थी श्रीरंग इनामदार यांचा समावेश होता. या सर्व सदस्यांनी एकमताने सन २०१७-१८ या वर्षातील पुरस्कारार्थीची निवड करण्यात आल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.