भारतीय महीला क्रिकेट टीमची विश्वविक्रमाला गवसणी, 320 धावांची भागीदारी
By admin | Published: May 15, 2017 08:14 PM2017-05-15T20:14:34+5:302017-05-15T22:51:41+5:30
भारतीय महीला क्रिकेट टीमने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात दीप्ति शर्मा आणि पूनम राउत या दोघींनी इतिहास रचला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पोचेफ्स्ट्रूम, दि. 15 - भारतीय महीला क्रिकेट टीमने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात दीप्ती शर्मा आणि पूनम राउत या दोघींनी इतिहास रचला आहे. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 320 धावांची भागीदारी केली. आंतरराष्ट्रीय महीला एकदिवसीय क्रिकेटमधील ही कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. दीप्ती शर्माने 188 धावांची खेळी केली मात्र, महीला क्रिकेटमध्ये द्विशतक झळकविणारी दुसरी महिला खेळाडू होण्याची तिची संधी हुकली .
दीप्तीने केलेल्या 188 धावा हा भारतीय महीला क्रिकेटमधला नवा विक्रम ठरला. शिवाय महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोच्च वयक्तिक धावसंख्या ठरली आहे. या विश्वविक्रमी खेळीदरम्यान दीप्तीने तब्बल 26 चौकार आणि 2 षटकार ठोकले. 188 धावांच्या या खेळीसाठी दीप्तिने केवळ 160 चेंडूंचा सामना केला. पूनम राउतने 109 धावांची खेळी करून दीप्तीला चांगली साथ दिली. 109 धावांची खेळी करून पूनम रिटायर्ड झाली.भारताच्या दोन महिला फलंदाजांनी एका वन डेत शतके ठोकण्याची ही दुसरी वेळ ठरली.याआधी मिल्टनमध्ये मिताली आणि रेश्मा यांनी शतकांची नोंद केली होती. भारतीय महिला खेळाडूने 150 च्या वर धावा काढण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 1997 मध्ये आॅस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क हिने डेन्मार्कविरुद्ध मुंबईत नाबाद 229धावांची खेळी केली होती. भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा विक्रम जया शर्मा हिच्या नावे होता. तिने पाकिस्तानविरुद्ध 2005 मध्ये कराचीत नाबाद 138 धावा ठोकल्या होत्या. याआधी कुठल्याही गड्यासाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम 268 धावांचा होता. इंग्लंडची सराह टेलर आणि कॅरोलिन अटकिन्सन यांनी द. आफ्रिकेविरुद्ध 2008 मध्ये लॉर्डस्वर सलामीला हा विक्रम केला होता. भारताकडून सर्वाधिक भागीदारीचा विक्रम याआधी रेश्मा गांधी आणि मिताली राज यांच्या नावे आहे. या जोडीने आयर्लंडविरुद्ध 1999 मध्ये मिल्टन येथे 285 धावांची नाबाद भागीदारी केली होती. भारताच्या दोन महिला फलंदाजांनी एका वन डेत शतके ठोकण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी मिल्टनमध्ये मिताली आणि रेश्मा यांनी शतकांची नोंद केली होती.
दक्षिण आफ्रिकेच्या पोचेफ्स्टूमच्या सेनवेस पार्कमध्ये आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 300 धावांची भागीदारी करणारी दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या दोघींची ही जगातील पहिलीच सलामीची जोडी ठरली आहे. दोघींच्या या जबरदस्त खेळीच्या बळावर भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात 358 धावा केल्या. 359 धावांचा सामना करायला उतरलेल्या आयर्लंडचा अख्खा संघ 40 षटकात केवळ 109 धावांमध्ये गारद झाला. भारतीय महीला संघाने 300 चा आकडा गाठण्याचीदेखील पहिलीच वेळ होती.