पेनेटाचा ग्रॅण्ड सलाम
By admin | Published: September 14, 2015 12:35 AM2015-09-14T00:35:12+5:302015-09-14T00:35:12+5:30
इटलीच्या फ्लाविया पेनेटाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत मायदेशातील सहकारी रोबर्टा विंचीचा ७-६, ६-२ ने पराभव केला
न्यूयॉर्क : इटलीच्या फ्लाविया पेनेटाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत मायदेशातील सहकारी रोबर्टा विंचीचा ७-६, ६-२ ने पराभव केला आणि कारकीर्दीत एकेरीमध्ये प्रथमच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावताना व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. ३३ वर्षीय पेनेटाने ९३ मिनिटांमध्ये विजय मिळवला आणि ओपन युगात एकेरीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम महिला चॅम्पियन ठरणारी सर्वांत प्रौढ खेळाडू ठरली.
पेनेटा म्हणाली, ‘माझे स्वप्न साकार झाल्यामुळे आनंद झाला.’ जेतेपदाचा चषक स्वीकारल्यानंतर काही वेळातच पेनेटाने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. मला अशाच प्रकारची निवृत्ती अपेक्षित होती. मी खूश आहे. यापूर्वी प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जेतेपद पटकावणारी इटलीची एकमेव टेनिसपटू फ्रान्सिस्का शियावोन होती. शियावोनने २०१० मध्ये फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत प्रथमच जेतेपद पटकावले होते. त्यावेळी २९ वर्षीय शियावोन जेतेपद पटकावणारी सर्वाधिक वय असलेली खेळाडू ठरली होती.
ओपन युगात प्रथमच आॅल इटली महिला ग्रॅण्डस्लॅम फायनल बघण्यासाठी आर्थर ऐश स्टेडियममध्ये २३,७७१ प्रेक्षंकासह इटलीचे पंतप्रधान मातेयों रेंजी उपस्थित होते. या विजयासह पेनेटा ३३ लाख डॉलर पुरस्कार रकमेची मानकरी ठरली, तर उपविजेती रोबर्टाला १६ लाख डॉलर्स रकमेवर समाधान मानावे लागले. पेनेटाने यापूर्वी यंदा पुरस्कार म्हणून एकूण केवळ ७,१२,३०१ डॉलर्सची रक्कम जिंकली होती, तर रोबर्टाची २०१५ ची पुरस्कार राशी ४,२२,१५८ डॉलर्स होती. पेनेटाने ४९ व्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत प्रथमच जेतेपदाचा मान मिळवला. प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचा विचार करता पेनेटाला सर्वाधिक स्पर्धा खेळाव्या लागल्या. फ्रान्सच्या मारिन बार्तोलीच्या तुलनेत पेनेटाने दोन स्पर्धा अधिक खेळल्या. बार्तोलीने २०१३ मध्ये विम्बल्डनमध्ये जेतेपद पटकावले होते.