ग्रँडमास्टर आनंद डॉक्टर आॅफ सायन्स
By admin | Published: June 28, 2016 09:34 PM2016-06-28T21:34:46+5:302016-06-28T21:34:46+5:30
चौषष्ट घरांचा राजा आणि भारताचा पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला मंगळवारी आयआयटी कानपूरने ४९व्या दीक्षान्त सोहळ्यात डॉक्टर आॅफ सायन्स ही उपाधी दिली.
आयआयटी कानपूर : विद्यार्थ्यांशी साधला संवाद
कानपूर : चौषष्ट घरांचा राजा आणि भारताचा पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला मंगळवारी आयआयटी कानपूरने ४९व्या दीक्षान्त सोहळ्यात डॉक्टर आॅफ सायन्स ही उपाधी दिली. आयआयटी सीनेटच्या वतीने आनंदला या उपाधीने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान आनंदर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, १९९८ साली मी भारताचा पहिला ग्रँडमास्टर बनलो, परंतु तरीही मी शिकत राहिलो. मी त्यानंतर जागतिक विजेतेपद या माझ्या पुढील लक्ष्याच्या दिशेकडे वाटचाल केली. तुम्ही देखील पदवीधर म्हणून बाहेर जाणार आहात. खूप आनंद साजरा करा, परंतु, आपल्या आयुष्यातील पुढील लक्ष्याचाही विचार करत रहा. आजही मी बुध्दिबळाच्या बाबतीत अधिकाधिक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण, आपण जे काही शिकतो किंवा जे काही ज्ञान घेतो, ते कधीही वाया जात नाही. जोपर्यंत मी ग्रँडमास्टर बनलो नव्हतो, तोपर्यंत माझ्यावर खूप दबाव होता. मात्र, मी हिम्मत सोडली नाही आणि कायम माझ्या चुकांपासून बोध घेत राहिलो, असेही आनंदने यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)
या कार्यक्रमासाठी आनंदने पारंपारिक पदवीधर गाऊन परिधान केला होता. याबाबत आनंदने सांगितले की, या कार्यक्रमासाठी जसा ड्रेस कोड आहे, तसाच ड्रेसकोड राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार स्वीकारताना ठेवला गेला होता. त्यावेळी आमच्याकडून सराव करुन घेतला गेला होता. मी खूप घाबरलेलो होतो. आज पुन्हा तसाच डे्रसकोड परिधान करुन आलोय, परंतु यावेळी मी घाबरलेलो नाही. तर यामुळे राष्ट्रपती भवनाच्या आठवणी ताज्या झाल्या.