महान हॉकीपटू बलबीरसिंग सिनियर यांचे निधन; हॉकी युगाची अखेर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 11:56 PM2020-05-25T23:56:03+5:302020-05-25T23:56:08+5:30

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह क्रीडाविश्वाची श्रद्धांजली

 Great hockey player Balbir Singh Sr. dies; The end of the hockey era | महान हॉकीपटू बलबीरसिंग सिनियर यांचे निधन; हॉकी युगाची अखेर

महान हॉकीपटू बलबीरसिंग सिनियर यांचे निधन; हॉकी युगाची अखेर

googlenewsNext

चंदीगड : आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेते भारताचे महान हॉकीपटू आणि माजी कर्णधार बलबीरसिंग दोसांज (बलबीर सिनियर) यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.

गेल्या दोन आठवड्यांपासून ते विविध प्रकारच्या आजारांशी दोन हात करत होते. त्यांच्या पश्चात मुलगी सुशबीर, तीन मुले कंवलबीर, करणवीर आणि गुरबीर असा परिवार आहे. मुले कॅनडात स्थायिक असल्याने ते येथे मुलगी सुशबीर आणि नातू कबीरसिंग भोमिया यांच्यासोबत राहत होते. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांना न्युमोनियावर तब्बल १०८ दिवस उपचार घेतल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. तीन वेळा आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेतेपद मिळवलेल्या बलबीर सिंग यांना ८ मे रोजी मोहलीच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान तीनदा ह्दयाघातदेखील झाला होता. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र अखेर सोमवारी सकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती फोटर््सचे संचालक अभिजितसिंग यांनी दिली. त्यानंतर नातू कबीरसिंग यांनी नानाजीचे निधन झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. बलबीर सिनियर यांच्या पार्थिवावर सायंकाळी चंदीगडच्या सेक्टर २५ स्थित विद्युत शवदाहिनीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. (वृत्तसंस्था)

पंजाबमधील मोहालीस्थित हॉकी स्टेडियमला महान बलबीरसिंग सिनियर यांचे नाव देण्याची घोषणा पंजाबचे क्रीडामंत्री राणा गुरमितसिंग
यांनी केली.

देदीप्यमान कारकीर्द

पंजाबच्या हरिपूर खालसा गावात १९२४ ला जन्मलेले बलबीरसिंग भारतीय हॉकी संघात आक्रमण फळीत (फॉरवर्ड) खेळणारे प्रतिभावंत क्रीडापटू होते. १९४८, १९५२ आणि १९५६ अशा सलग तीन आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता. भारतीय संघ हॉकी विश्वचषक स्पर्धेत सर्वप्रथम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सहभागी झाला होता. १९७५ साली मलेशियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली.

बलबीर सिंग यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये पुरुष हॉकीच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम अजूनही बलबीरसिंग यांच्याच नावे आहे. १९५२ साली हेलसिंकी येथे पार पडलेल्या आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यात भारताने नेदरलँड्सला ६-१ अशी धूळ चारली होती. त्यात पाच गोल बलबीरसिंग यांचे होते. त्यांनी भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपददेखील भूषवले. १९५६ साली मेलबर्न आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण स्पर्धेत ३८ गोल केले आणि विशेष म्हणजे प्रतिस्पर्धा संघाला भारताविरुद्ध एकही गोल करता आला नव्हता.

महान मेजर ध्यानचंद यांच्या समकक्ष मानले जाणारे बलबीरसिंग यांना भारतरत्न देण्याची मागणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केली होती. क्रीडाक्षेत्रातील योगदानासाठी मागच्यावर्षी त्यांना पंजाब शासनाचा महाराजा रणजीतसिंग पुरस्कारदेखील दिला होता.

मेजर ध्यानचंद यांच्यानंतर भारतीय हॉकी विश्वात महान खेळाडू बलबीरसिंग सिनियर हेच होते, या शब्दात महान धावपटू मिल्खासिंग यांनी
त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मान्यवरांच्या संवेदना

‘महान हॉकीपटू बलबीरसिंग सिनियर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून वेदना झाल्या. या महान आॅलिम्पियनच्या स्मृतींचा वारसा भावी पिढीला सतत प्रेरणादायी ठरावा. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांचे कुटुंबीय,मित्र आणि चाहत्यांच्याप्रती संवेदना.’
-राष्टÑपती रामनाथ कोविंद

‘बलबीर सिनियर यांनी महान हॉकीपटूच नव्हे तर मेंटर म्हणूनही विशिष्ट ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अविस्मरणीय खेळासाठी ते सतत स्मरणात राहतील. यशाची कमान उभारून त्यांनी देशाची शान उंचावली. त्यांच्या निधनाबद्दल दु:ख वाटते. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना.’
-पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘पद्मश्री अािण महान हॉकीपटू बलबीर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. त्यांनी स्वत:च्या स्टिकद्वारे जागतिक हॉकीवर अमिट छाप उमटवली होती. त्यांना भेटू शकलो, त्यांच्यासोबत काहीवेळ घालवू शकलो याबद्दल स्वत:ला भाग्यवान मानतो. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे.’
-अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

‘‘महान हॉकी खेळाडू बलबीरसिंग सिनियर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. तीनवेळा आॅलिम्पिक सुवर्ण विजेत्या भारतीय हॉकी संघाचे महत्त्वाचे खेळाडू म्हणून देशाला त्यांच्यावर गर्व वाटतो. त्यांनी माझी विनम्र श्रद्धांजली. दिवंगत आत्म्याला शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.’
-किरेन रिजिजू, केंद्रीय क्रीडामंत्री

Web Title:  Great hockey player Balbir Singh Sr. dies; The end of the hockey era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.