मुंबई मॅरेथॉनला भल्या पहाटे उत्साहात सुरुवात, ५५ हजार धावपटू सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 06:45 AM2020-01-19T06:45:34+5:302020-01-19T07:22:36+5:30
मुंबई मॅरेथॉनला आज पहाटे ५.१५ वाजल्यापासून उत्साहात सुरुवात झाली आहे. या मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील व्यावसायिक धावपटूंसोबत हजारो हौशी धावपटू तसेच मुंबईकर अबालवृद्ध सहभागी झाले आहेत.
मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनला आज पहाटे ५.१५ वाजल्यापासून उत्साहात सुरुवात झाली आहे. या मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील व्यावसायिक धावपटूंसोबत हजारो हौशी धावपटू तसेच मुंबईकर अबालवृद्ध सहभागी झाले आहेत. मॅरेथॉनच्या एलिट गटामध्ये इथियोपिया आणि केनिया या आफ्रिकन देशातील धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा रंगणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. तर वरळी डेअरी येथून अर्धमॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. मुंबई मॅरेथॉनचे यंदाचे हे १७वे वर्ष असून, या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉनमध्ये सुमारे ५५, ३२२ धावपटूंनी सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये ९,६६० मुख्य मॅरेथॉन आणि १५ हजार २६० धावपटू अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी होती. त्याचप्रमाणे, खुली १०किमी रन (८,०३२), ड्रीम रन (१९,७०७), वरिष्ठ नागरिक रन (१,०२२), दिव्यांग (१,५९६) व पोलीस कप (४५ संघ) अशा इतर गटांमध्येही सहभागी झाले आहे.
एकूण ४ लाख २० हजार यूएस डॉलर किंमतीची बक्षिस रक्कम असलेल्या या मॅरेथॉनमध्ये मुख्य स्पर्धेतील पहिल्या तीन धावपटूंना अनुक्रमे ४५ हजार, २५ हजार आणि १७ हजार डॉलरचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. अव्वल तीन भारतीय धावपटूंना अनुक्रमे ५, ४, व ३ लाख रुपयांचे बक्षिस मिळेल.