ग्रीनपार्कमध्ये गैरव्यवस्था, तिकिटांचा काळाबाजार, पोलिसांचा लाठीमार

By Admin | Published: September 26, 2016 12:09 AM2016-09-26T00:09:08+5:302016-09-26T00:09:08+5:30

दुरवस्थेसाठी कुविख्यात असलेल्या उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेच्या (युपीसीए) अधिपत्याखाली असलेल्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात

In Green Park, Misconceptions, BlackBerry Stamps, Police Sticks | ग्रीनपार्कमध्ये गैरव्यवस्था, तिकिटांचा काळाबाजार, पोलिसांचा लाठीमार

ग्रीनपार्कमध्ये गैरव्यवस्था, तिकिटांचा काळाबाजार, पोलिसांचा लाठीमार

googlenewsNext

कानपूर : दुरवस्थेसाठी कुविख्यात असलेल्या उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेच्या (युपीसीए) अधिपत्याखाली असलेल्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान तिकीटधारकांना लाठ्यांचा प्रसाद मिळाला.
कसोटी सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये प्रेक्षकांची प्रतीक्षा करणाऱ्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये चौथ्या दिवशी रविवारी प्रेक्षकांची गर्दी उसळली. साप्तहिक सुटी असल्यामुळे आज सकाळपासून स्टेडियमच्या बाहेर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. सामना रंगतदार स्थितीत असल्यामुळे युपीसीए प्रशासनाला प्रेक्षकांची गर्दी होणार असल्याची कल्पना होती, पण तरी त्यासाठी काही विशेष व्यवस्था केली नाही. त्यामुळे सकाळी ८ वाजता स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धक्काबुक्की करणाऱ्या प्रेक्षकांना सांभाळताना पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. पोलिसांनी अनेकदा लाठ्या फिरवीत गोंधळ घालणाऱ्या प्रेक्षकांना पांगवले. दरम्यान, युपीसीएचे पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी आपल्या नातेवाईकांना व मित्रांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी व्यस्त असल्याचे दिसून आले. चौथ्या दिवसाचा खेळ प्रारंभ होण्यापूर्वीच स्टेडियम गर्दीने फुलून गेले होते. तिकीट असलेल्या अनेक चाहत्यांना मात्र पोलिसांनी बळाचा वापर करीत परत जाण्यास सांगितले. निराश झालेले प्रेक्षक आवडत्या खेळाडूंची एक झलक बघण्यासाठी ११ वाजेपर्यंत स्टेडियम परिसरात फिरत असल्याचे चित्र दिसले.
दरम्यान, तिकिटांचा काळाबाजरही झाला. ‘बडा चौराहा, परेड अणि सिव्हिल लाईन्स’ या भागात २५० रुपये दर असलेली स्टँडची तिकिटे एक हजार रुपये दराने विकल्या गेली. अन्य स्टँडच्या तिकिटांचाही काळाबाजार झाल्याचे वृत्त आहे. तिकिटांचा काळाबाजार करण्यात आल्याच्या प्रश्नावर युपीसीएचे मीडिया व्यवस्थापक तालिब खान यांनी उत्तर देण्याचे टाळले.
दरम्यान, गेल्या वर्षी ११ आॅक्टोबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या वन-डे लढतीच्या वेळीही युपीसीएला गैरव्यवस्था व तिकिटांच्या काळाबाजारामुळे टीका सहन करावी लागली होती.
गोविंद नगर येथून आलेला चाहता राहुल म्हणाला, प्रत्येक वेळी प्रेक्षकांना अशा गैरव्यवस्थेला सामोरे जावे लागते. सामना बघण्यासाठी आम्ही तिकीट खरेदी करतो, पण मैदानावरील सुरक्षा व्यवस्था व पोलीस प्रशासनामुळे आम्हाला सामना बघता येत नाही.’ (वृत्तसंस्था)

Web Title: In Green Park, Misconceptions, BlackBerry Stamps, Police Sticks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.