माजी खेळाडूंच्या प्रतिकूल वक्तव्यामुळे दु:ख : विराट
By Admin | Published: December 11, 2015 12:28 AM2015-12-11T00:28:22+5:302015-12-11T00:28:22+5:30
ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत, असे तथाकथित ‘तज्ज्ञ’ माजी खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळ आणि खेळाडूंवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियेमुळे दु:ख होत आहे
नवी दिल्ली : ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत, असे तथाकथित ‘तज्ज्ञ’ माजी खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळ आणि खेळाडूंवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियेमुळे दु:ख होत आहे, असे मत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेवर ३-० ने ऐतिहासिक विजय मिळवूनही काही ‘तज्ज्ञांनी’ संघावर टीका केली होती; यामुळे कोहली नाराज झाला आहे.
‘बीसीसीआय.टीव्ही’शी बोलताना कोहली म्हणाला, ज्यांनी स्वत: क्रिकेट खेळले आहे ते लोक अशा प्रकारची टीका करतात हे पाहून मला त्रास होतो. सर्वजण असे करतात असे मला म्हणायचे नाही. यापैकी काहीजण खेळाडूंची मानसिकता समजून घेतात. ते खेळाडूंना मदत करतात. चांगल्या गोष्टी समजावून सांगतात. कारण कारकिर्दीमध्ये ते या अनुभवातून गेलेले असतात, पण
काही लोक केवळ नकारात्मक गोष्टींवर लक्ष देतात. अशा लोकांना पाहून वाईट वाटते.
कोहली पुढे म्हणाला, ‘‘ज्या लोकांचा खेळ पहात आपण मोठे झालो त्यांनी अशी टीका टिप्पणी केली तर त्यांच्याविषयी मनात असलेला आदरभाव आपोआपच कमी होतो. जर खेळाडूंमध्ये काही उणीव असल्यास आणि ती त्याला वैयक्तिकपणे निवारण करण्यास मदत केली तर अशा लोकांविषयी आदरभाव निश्चितच वाढेल. ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे, त्यांच्याविषयी माझ्या मनात निश्चित आदरभाव राहील. पण ज्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर ते कोणत्या अधिकाराने भाष्य करतात, हे मात्र माझ्या आकलनापलीकडे आहे. (वृत्तसंस्था)