गेल वादळात आफ्रिका भुईसपाट
By admin | Published: January 10, 2015 11:47 PM2015-01-10T23:47:16+5:302015-01-10T23:47:16+5:30
स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या (३१ चेंडूंत ७७ धावा) वादळी अर्धशतकाच्या बळावर वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ४ विकेट्सनी शानदार विजय मिळविला़
केपटाऊन : स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या (३१ चेंडूंत ७७ धावा) वादळी अर्धशतकाच्या बळावर वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ४ विकेट्सनी शानदार विजय मिळविला़
गेलने आपल्या खेळीत ८ उत्तुंग षटकार आणि ५ चौकार लगावताना आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला़ विशेष म्हणजे पहिल्या सहा चेंडूंत केवळ १ धाव करणाऱ्या गेलने आपले अर्धशतक अवघ्या १७ चेंडूंत पूर्ण केले़
गेलला भारताच्या युवराजसिंगचा विक्रम मात्र तोडता आला नाही़ युवीने २००७ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये अवघ्या १२ चेंडूंत अर्धशतकी खेळी केली होती़ त्याने इंग्लंडविरुद्ध ही किमया साधली होती़ गेलच्या सुपर खेळीनंतरही विंडीजने अवघे ४ चेंडू शिल्लक ठेवून १९़२ षटकांत ६ गड्यांच्या बदल्यात १६६ धावांचे लक्ष्य पूर्ण केले़
ख्रिस गेल ११व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला़ त्यानंतर विंडीज या लढतीत सहज विजय मिळवेल, असे वाटत होते; मात्र यानंतर एकापाठोपाठ एक गडी बाद झाले़ मात्र, किरोन पोलार्डने अखेरच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डेव्हिड वेईसीला चौकार लगावताना संघाला विजय मिळवून दिला़
त्याआधी दक्षिण आफ्रिकेने रिली रोसेयू (नाबाद ५१) च्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर निर्धारित षटकांत ४ बाद १६५ धावांचे कठीण आव्हान उभे केले़ रोसेयूने ४० चेंडूंचा सामना करताना ५ चौकार लगावले़ आफ्रिकेकडून फाफ डू प्लेसिस याने ३८ धावांची खेळी केली़ वेस्ट इंडीजकडून शेल्डन कोटरेल याने ३३ धावांत २, तर जेसन होल्डरने २० धावांत १ गडी बाद केला़ (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ४ बाद १६५़ (रिझा हेन्ड्रिक्स १२, फाफ डु प्लेसिस ३८, रिली रोसेयू नाबाद ५१, डेव्हिड मिलर २४, फरहान बेहर्डीन नाबाद १८़ शेल्डन कोटरेल २/३३, जेसन होल्डर १/२०)़ वेस्ट इंडीज : १९़२ षटकांत ६ बाद १६८़ (ड्वेन स्मिथ २०, ख्रिस गेल ७७, मार्लोन सॅम्युअल्स ४१, किरोन पोलार्ड नाबाद ८़ इमरान ताहिर ३/२८, वेन पार्नेल २/३९)़