गॅरन्टी द्या, तरच प्रशिक्षकपदासाठी अर्ज करतो - रवी शास्त्री

By admin | Published: June 23, 2017 06:57 AM2017-06-23T06:57:54+5:302017-06-23T06:57:54+5:30

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्रींचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

Guarantee only, then applying for coach - Ravi Shastri | गॅरन्टी द्या, तरच प्रशिक्षकपदासाठी अर्ज करतो - रवी शास्त्री

गॅरन्टी द्या, तरच प्रशिक्षकपदासाठी अर्ज करतो - रवी शास्त्री

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - कर्णधार विराट कोहलीसोबतच्या वादानंतर अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयमध्ये संघासाठी नवा प्रशिक्षक निवडण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. सल्लागार समितीचे सदस्य सचिन, सौरव, लक्ष्मण यांच्याकडे भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी आहे. या समितीला लवकरात लवकर कुंबळेच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करायची आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा प्रशिक्षकपदासाठी पर्यायी नावांचा विचार केला जात आहे. तसंच प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. त्यात आता विराटची पसंती असलेल्या रवी शास्त्रींचे नाव पुढे येत आहे.
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्रीसह वीरेंद्र सेहवाग, रिचर्ड पायबस, टॉम मुडी यांची नावेही चर्चेत आहेत. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यापूर्वी रवी शास्त्रीने एक अट ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. क्रिकेटनेक्स्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले प्रशिक्षकपदी निवड करण्याची हमी दिली तरच अर्ज करेन. प्रशिक्षकपदासाठी रांगेत उभं राहण्याचा प्रश्नच नाही. बीसीसीआय आणि सल्लागार समितीनं ही अट मान्य केली तर शास्त्रींचा प्रशिक्षकपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शास्त्रींचं नाव प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आल्यानं या पदासाठी अर्ज करणाऱ्या वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, रिचर्ड पायबस, लालचंद राजपूत आणि डोडा गणेश यांचा मार्ग खडतर झाला आहे, असं बोललं जात आहे.

6 महिन्यांपासून कोहली आणि कुंबळेमध्ये होता अबोला
कोहली आणि कुंबळेनं गेल्या वर्षी डिसेंबर 2016मध्ये इंग्लंड टेस्ट सीरिज संपल्यानंतर एकमेकांशी बोलणं थांबवलं होतं. दोघांमध्ये वाद होता ते माहीत होतं. मात्र ते 6 महिने एकमेकांशी बोलत नसल्यानं आम्हीसुद्धा अचंबित झालो, असंही बीसीसीआयच्या एका अधिका-यानं सांगितलं आहे. रविवारी भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या अंतिम सामन्यानंतर दोघांमध्ये एक बैठक झाली आणि एकमेकांसोबत काम करण्यास इच्छुक नसल्याचं दोघांनाही समजलं. अनिल कुंबळेला वादामागील कारण विचारण्यात आलं तेव्हा त्यानं विराटची कोणतीही समस्या नाही. पण माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर कोहलीला आक्षेप असल्याचं कुंबळेनं सांगितलं, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच विराटला वाटायचं की, स्वतः क्षेत्रातही अनिल कुंबळे हस्तक्षेप करतोय. कुंबळे स्वतःचा सल्ला नेहमीच कोहलीला देत होता. मात्र कोहलीला त्याचा तो सल्ला स्वतःच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केल्यासारखा वाटायचा, असंही बीसीसीआयच्या अधिका-यानं सांगितलं आहे.

विराटनं कुंबळेच्या स्वागताचं ट्विट केलं डिलीट
रागाच्या भरात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या स्वागताचं ट्विट अकाऊंटवरून काढून टाकलं आहे. अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर 23 जून 2016 रोजी कोहलीनं हे ट्विट केलं होतं. कोहलीनं ट्विटमध्ये म्हटलं होतं की, अनिल कुंबळे सर तुमचं मनापासून स्वागत, आम्हाला तुमच्यासोबत काम करायला आवडेल.

प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयचा अर्ज मागविण्याचा निर्णय
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे. कुंबळे यांच्या कार्यशैलीवर कर्णधार विराट कोहलीने आक्षेप नोंदविल्यानंतर त्यांनी विंडीज दौऱ्यापर्यंत आपला करार वाढविण्यास नकार दिला. या प्रक्रियेसोबत जुळलेल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, की अर्ज सादर करण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यात उच्च पात्रता व दर्जा असलेल्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येईल. 

 

Web Title: Guarantee only, then applying for coach - Ravi Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.