लेखी हमी द्या, तरच संघ भारतात येणार
By admin | Published: March 11, 2016 03:49 AM2016-03-11T03:49:55+5:302016-03-11T03:49:55+5:30
विश्वकप टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारत सरकारकडून जोपर्यंत सुरक्षेबाबत लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तान संघ भारतात दाखल होणार नाही, असे पाकिस्तान सरकारने सांगितले.
लाहोर : विश्वकप टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारत सरकारकडून जोपर्यंत सुरक्षेबाबत लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तान संघ भारतात दाखल होणार नाही, असे पाकिस्तान सरकारने सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून लाहोरमध्ये पाक संघ प्रतीक्षा करीत आहे.
पाकिस्तानच्या एका वृत्त वाहिनीच्या हवाल्यानुसार राष्ट्रीय संघ शुक्रवारी भारताकडे प्रयाण करण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डातर्फे (पीसीबी) आपल्या संघाला आयसीसी स्पर्धेसाठी भारतात जाण्यास मंजुरी मिळू शकते.
दरम्यान, पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितले, की पाक सरकारने क्रिकेट संघाला भारतात जाण्यास अद्याप परवानगी दिली नाही, कारण भारत सरकारतर्फे त्यांना सुरक्षेबाबत कुठलेही आश्वासन मिळालेले नाही. पीसीबीने संघाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने धरमशाला येथे १९ मार्च रोजी होणारा सामना कोलकातातील ईडन गार्डनवर स्थानांतरितणाचा निर्णय घेतला.
> आश्वासन मिळाले नाही तर संघ जाणार नाही : निसार
लाहोर : पाकिस्तान संघ टी-२० विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अद्याप भारतात दाखल झालेला नाही. पाक संघ अद्याप त्यांच्या सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करीत आहे. त्यात पाकिस्तानचे मंत्री चौधरी निसार अली खान यांनी धमकीच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट कसे खेळता येईल, असे भडकवणारे वक्तव्य केले आहे. चौधरी निसार अली म्हणाले, धमकी मिळत असताना क्रिकेट कसे खेळता येईल. त्यामुळे यापूर्वी सुरू असलेल्या वादात आणखी तेल ओतले गेले. आयसीसीने पाकिस्तान संघाच्या सुरक्षेच्या चिंतेची दखल घेताना पूर्वघोषित कार्यक्रमानुसार १९ मार्च रोजी धरमशाला येथे खेळला जाणारा सामना कोलकाता येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला, पण पीसीबीला भारताकडून पूर्ण सुरक्षेची हमी पाहिजे आहे. चौधरी निसार
अली म्हणाले,
‘धमकी केवळ पाकिस्तानबाबत आहेत. दहशतीच्या सावटात संघ सर्वोत्तम कामगिरी कशी करणार? भारत सरकारने संघाला फुलप्रूफ सुरक्षेची
हमी द्यायला हवी.
जर आम्हाला तसे आश्वासन मिळाले नाही तर पाक संघ भारतात जाणार नाही.’पीसीबीचे
अध्यक्ष शहरयार खान म्हणाले, अन्य संघांना विरोध होत नाही आणि त्यांना लक्ष्यही केले जात नाही, पण पाकिस्तानबाबत वेगळी भूमिका आहे. त्यामुळे भारत सरकारकडून पूर्ण सुरक्षेच्या आश्वासनाची प्रतीक्षा आहे.’
>> निर्णय पाकच्या हातात : ठाकूर
नवी दिल्ली : बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूरने गुरुवारी रात्री टी-२० विश्वचषक खेळण्याचा निर्णय आता पाकिस्तानच्या हाती असल्याचे वक्तव्य बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी केले आहे.
ठाकूर म्हणाले, की भारत विश्वचषकच्या सर्व संघांना संपूर्ण सुरक्षा देईल. मात्र आता पाकिस्तानला निर्णय घ्यायचा आहे, की त्यांना भारतात यायचे आहे की नाही. ठाकूर म्हणाले, की पाकिस्तान बहाणा करत आहे. मात्र भारत सर्व संघांना संपूर्ण सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे.
बीसीसीआयचे सचिव म्हणाले, की आम्ही प्रत्येक देशाला आम्ही वेगवेगळा ग्रीन सिग्नल देऊ शकत नाही. तरी आमच्याकडून पूर्ण ग्रीन सिग्नल आहे. पाकिस्तानने भारतात खेळण्यासाठी यावे, असेही ते म्हणाले.