गुजरातचा मुंबईवर ६ गडी राखून विजय
By admin | Published: May 21, 2016 11:30 PM2016-05-21T23:30:47+5:302016-05-21T23:30:47+5:30
कर्णधार सुरेश रैना आणि मॅक्युलमच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर गुजरातने मुंबईवर ६ गडी राखून विजय मिळवला. रैनाने कर्णधाराला साजेशी खेळी करताना ३६ चेंडूत ५८ धावांची खेळी केली
Next
>ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. २१ : कर्णधार सुरेश रैना आणि मॅक्युलमच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर गुजरातने मुंबईवर ६ गडी राखून विजय मिळवला. सलामीविर फिंच झटपट बाद झाल्यानंतर रैना-मॅक्युलम या जोडीने आक्रमक फलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढली. रैना-मॅक्युलम ने दुसऱ्या गड्यासाठी ९ षटकात ९६ धावांची भागीदारी केली. रैनाने कर्णधाराला साजेशी खेळी करताना ३६ चेंडूत ५८ धावांची खेळी केली तर मॅक्युलमने २७ चेंडूत आक्रमक ४८ धावा केल्या. डेवेन स्मिथने ताबोडतोप फलंदाजी करताना २७ चेंडूत ३७ धावांची नाबाद खेळी केली.
त्यापुर्वी, गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कर्णधार रोहित शर्माने करून दिलेल्या आक्रमक सुरुवातीनंतर ड्वेन स्मिथ व धवल कुलकर्णीच्या अचूक गोलंदाजीपुढे धावसंख्येला खीळ बसल्याने गतविजेत्या मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सविरुद्ध २० षटकांत ८ बाद १७२ धावांची मजल मारली. सलग दोन षटकांत ३ प्रमुख फलंदाज बाद झाल्याने मुंबईकर दडपणाखाली आले. स्मिथने भेदक मारा करताना मार्टिन गुप्टिल व कृणाल पंड्या यांना एकाच षटकात बाद करून मुंबईला बॅकफूटवर आणले.
मात्र, युवा फलंदाज नितीश राणाने या दडपणाचा आपल्या फलंदाजीवर कोणताही विपरीत परिणाम होऊ न देता ३६ चेंडूत ७ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी करताना ७० धावांचा तडाखा दिला. त्याने अनुभवी जोस बटलरसह चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची निर्णायक भागीदारी करून मुंबईला सावरले. बटलर ३१ चेंडूत ३३ धावा काढून परतला. यानंतर राणाही लगेच बाद झाल्याने पुन्हा मुंबईच्या धावसंख्येला ब्रेक लागला. यानंतर केरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या व हरभजनसिंग यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्यांना फारसे यश आले नाही.