गुजरात लायन्सची विजयी ‘गर्जना’
By admin | Published: April 12, 2016 03:49 AM2016-04-12T03:49:13+5:302016-04-12T12:14:52+5:30
धडाकेबाज अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने केलेला भेदक मारा आणि सलामीवीर अॅरॉन फिंचच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर गुजरात लायन्स संघाने आपला पहिला आयपीएल विजय
मोहाली : धडाकेबाज अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने केलेला भेदक मारा आणि सलामीवीर अॅरॉन फिंचच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर गुजरात लायन्स संघाने आपला पहिला आयपीएल विजय नोंदवताना बलाढ्य किंग्ज इलेव्हन पंजाबला ५ गडी राखून नमवले. पंजाबने दिलेल्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने ५ फलंदाजांच्या मोबदल्यात १७.४ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. आक्रमक अर्धशतक ठोकणारा फिंच सामनावीर ठरला.
आयएस बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातने यजमानांना ६ बाद १६१ धावांत रोखले. ड्वेन ब्राव्हो (४/२२) आणि रवींद्र जडेजा यांनी भेदक मारा करताना पंजाबला मर्यादित धावसंख्येवर रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात अडखळती झाली. पहिल्याच षटकात आक्रमक फलंदाज ब्रँडन मॅक्युलम बाद झाल्यानंतर फिंचने कर्णधार सुरेश रैनासह ५१ धावांची भागीदारी केली. रैना २० धावा काढून बाद झाला.
पंजाब पुनरागमन करणार, असे दिसत होते. मात्र फिंच व दिनेश कार्तिक यांनी ६५ धावांची भागीदारी केली. फिंच ४७ चेंडूंत १२ चौकारांसह ७४ धावा काढून बाद झाला. यानंतर कार्तिकने अखेरपर्यंत किल्ला लढवून नाबाद ४२ धावांसह संघाच्या पहिल्यावहिल्या विजयावर शिक्का मारला. संदीप शर्मा, मिचेल जॉन्सन, मार्कस स्टोइनीस व प्रदीप साहू यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी, मुरली विजय व मनन व्होरा यांनी सावध सुरुवातीनंतर गुजरातच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. विजय - मनन यांनी ७८ धावांची आक्रमक सलामी देताना पंजाबला शानदार सुरुवात करून दिली. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर मनन झेलबाद झाला. मननने २३ चेंडूंत ३८ धावा काढताना ४ चौकार व २ षटकारांसह खेळी सजवली. विजयनेही त्याला चांगली साथ देत आक्रमक फलंदाजी केली. विजयने ३४ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ४२ धावा फटकावल्या. जडेजानंतर ब्राव्होचा ‘चॅम्पियन’ शो सुरू झाला. ब्राव्होने १२ व्या षटकात ग्लेन मॅक्सवेल (२) व कर्णधार डेव्हिड मिलर (१५) यांना बाद करून पंजाबच्या फलंदाजीला खिंडार पाडले. वृद्धिमान साहा (२०) व मार्कस स्टोइनीस (३३) यांनी ५५ धावांची भागीदारी केली. स्टोइनीसच्या आक्रमकतेच्या जोरावर पंजाबने दीडशेचा पल्ला गाठला.
अखेरच्या षटकात पुन्हा एकदा ब्राव्होने दोन बळी घेत साहा व स्टोइनीसला
बाद करून पंजाबला मर्यादित धावसंख्येवर रोखले.
संक्षिप्त धावफलक :
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ६ बाद १६१ (मुरली विजय ४२, मनन व्होरा ३८, मार्कस स्टोइनीस ३३; ड्वेन ब्राव्हो ४/२२, रवींद्र जडेजा २/३०) पराभूत वि. गुजरात लायन्स : १७.४ षटकांत ५ बाद १६२ (अॅरॉन फिंच ७४, दिनेश कार्तिक ४२; संदीप शर्मा १/२१, मार्कस स्टोइनीस १/२७).