गुजरातचा धुव्वा...

By admin | Published: April 22, 2016 02:39 AM2016-04-22T02:39:22+5:302016-04-22T02:39:22+5:30

एकहाती वर्चस्व राखलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दणदणीत विजय मिळवताना आतापर्यंत अपराजित राहिलेल्या गुजरात लायन्सला १० विकेट्सने लोळवले.

Gujarat's rubbish ... | गुजरातचा धुव्वा...

गुजरातचा धुव्वा...

Next

राजकोट : एकहाती वर्चस्व राखलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दणदणीत विजय मिळवताना आतापर्यंत अपराजित राहिलेल्या गुजरात लायन्सला १० विकेट्सने लोळवले. सलग तीन सामने जिंकलेल्या गुजरातची या वेळी हैदराबादपुढे दाणादाण उडाली. गुजरातला ८ बाद १३५ धावांवर रोखल्यानंतर हैदराबादने एकही फलंदाज न गमावता १४.५ षटकांतच विजयी लक्ष्य गाठले.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून हैदराबादने यजमान गुजरातला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. गोलंदाजांनी, खास करून भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा करत गुजरातला २० षटकांत ८ बाद १३५ धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार डेव्हिड वॉर्नर व शिखर धवन यांच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर हैदराबादने १४.५ षटकांतच विजय मिळवला. वॉर्नरने ४८ चेंडंूत ९ चौकारांसह नाबाद ७४ धावा काढल्या, तर खराब फॉर्मशी झगणाऱ्या शिखरनेही फॉर्ममध्ये येत ४१ चेंडंूत ५ चौकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. या दोघांनी गुजरातच्या कोणत्याही गोलंदाजाला संधी न देता हैदराबादचा सलग दुसरा विजय साकारला.
तत्पूर्वी, पहिल्याच षटकात आक्रमक अ‍ॅरोन फिंच बाद झाल्यानंतर कर्णधार सुरेश रैनाच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर गुजरातला ८ बाद १३५ धावांची मजल मारण्यात यश आले. रैना व ब्रँडन मॅक्युलम यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. मात्र मॅक्युलमनंतर ठराविक अंतराने विकेट्स पडल्याने पुन्हा गुजरातची घसरगुंडी उडाली. मॅक्युलमसह दिनेश कार्तिक, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा झटपट बाद झाल्याने गुजरातच्या धावसंख्येला ब्रेक लागला. रैनाने एकाकी झुंज देताना ५१ चेंडंूत ९ चौकारांसह ७५ धावा फटकावल्या. भुवनेश्वरने २९ धावांत ४ बळी घेत गुजरातच्या फलंदाजीला खिंडार पाडले.संक्षिप्त धावफलक :
गुजरात लायन्स : २० षटकांत ८ बाद १३५ धावा (सुरेश रैना ७५, ब्रँडन मॅक्युलम १८; भुवनेश्वर कुमार ४/२९, विपुल शर्मा १/१०, मुस्तफिझुर रहमान १/१९) पराभूत वि. सनरायझर्स हैदराबाद : १४.५ षटकांत बिनबाद १३७ (डेव्हिड वॉर्नर नाबाद ७४, शिखर धवन नाबाद ५३)

Web Title: Gujarat's rubbish ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.