गुकेश डी. याची लक्षवेधी कामगिरी

By admin | Published: December 29, 2016 01:21 AM2016-12-29T01:21:17+5:302016-12-29T01:21:17+5:30

भारताचा उदयोन्मुख १० वर्षीय बुध्दिबळपटू गुकेश डी. याने मुंबई आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत लक्षवेधी कामगिरी करताना हंगेरीचा ग्रँडमास्टर अ‍ॅडम

Gukesh D. Its remarkable performance | गुकेश डी. याची लक्षवेधी कामगिरी

गुकेश डी. याची लक्षवेधी कामगिरी

Next

मुंबई : भारताचा उदयोन्मुख १० वर्षीय बुध्दिबळपटू गुकेश डी. याने मुंबई आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत लक्षवेधी कामगिरी करताना हंगेरीचा ग्रँडमास्टर अ‍ॅडम होर्वाथ याला बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. तर, स्पर्धेतील अव्वल मानांकीत ग्रँडमास्टर संदिपन चंदाला मात्र महाराष्ट्राचा इंटनॅशनल मास्टर समीर कठमलेविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले.
बीकेसी येथील माऊंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गुकेशने सर्वांचे लक्ष वेधले. २२३६ इलो रेटिंगसह खेळणाऱ्या गुकेशने आपल्याहून अधिक वरिष्ठ प्रतिस्पर्धी असलेल्या ग्रँडमास्टर होवार्थला (इलो २५०१) चांगलेच दबावाखाली ठेवले. प्रत्येक चालीमध्ये त्याने संरक्षणावर भर देताना होवार्थच्या आक्रमणाला रोखण्यात यश मिळवले. होवार्थने हत्ती आणि घोड्याचा वापर करुन गुकेशचे संरक्षण भेदण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, त्यात यश न आल्याने अखेर होवार्थने बरोबरी मान्य करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे स्पर्धेत ज्यूनिअर गटातही खेळत असलेल्या गुकेशने सलग तिसरा विजय मिळवताना सर्वाधिक ३ गुणांसह गटात अव्वल स्थान मिळवले आहे.
मुख्य गटात एकीकडे गुकेशने ग्रँडमास्टरला बरोबरी मान्य करण्यास भाग पाडल्यानंतर, महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत समीर कठमलेने अव्वल खेळाडू ग्रँडमास्टर संदिपन चंदला बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. समीरने सुरुवातीला संदिपनच्या आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर देत त्याला बचावात्मक पवित्रा
घेण्यास भाग पाडले. यानंतर, समीरने संदिपनचे प्रत्येक आक्रमण परतावून लावले.
अन्य एका लढतीत आंध्र प्रदेशच्या अर्जुन एरिगैसी यानेही चमकदार कामगिरी करताना युक्रेनच्या चौथ्या मानांकीत ग्रँडमास्टर विटली बर्नांड्स्की (इलो २५४०) याला बरोबरीत रोखले. तसेच महाराष्ट्राच्या सम्मेद शेटे याने अर्मेनियाच्या करेन मोवस्झीस्झीयनला बरोबरीत रोखले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Gukesh D. Its remarkable performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.