कारुआनाशी भिडणार गुकेश; अग्रस्थान बळकट करण्याचे असेल लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 07:26 AM2024-04-18T07:26:50+5:302024-04-18T07:27:14+5:30
या लढतीत विजय मिळवून अग्रस्थान बळकट करण्याचे त्याचे लक्ष असेल.
टोरंटो : रशियाच्या इयान नेपोमनियाची याच्यासोबत संयुक्त आघाडीवर असलेला भारताचा डी. गुकेश हा कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या ११व्या फेरीत अमेरिकेच्या अग्रमानांकित फॅबियानो कारुआनाशी भिडणार आहे. या लढतीत विजय मिळवून अग्रस्थान बळकट करण्याचे त्याचे लक्ष असेल. आर. प्रज्ञानानंदाचा सामना अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याच्याशी होणार आहे. स्पर्धेत केवळ चार फेऱ्यांचा खेळ शिल्लक आहे. भारताच्या या दोन किशोरवयीन खेळाडूंसाठी ही चांगली संधी आहे. विदित गुजराथीनेही आव्हान कायम राखले आहे आणि त्याला कामगिरीत थोडीशी सुधारणा करण्याची गरज आहे.
बुद्धिबळातील जागतिक संघटना फिडेच्या ध्वजाखाली खेळणारा नेपोमनियाची हा या स्पर्धेतील एकमेव अपराजित खेळाडू आहे; पण त्याला पुढील दोन फेऱ्यांत कडव्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागणार आहे. पुढील फेरीत विदित आणि नेपोमनियाची आमनेसामने असतील. त्यानंतर रशियाच्या या खेळाडूला प्रज्ञानानंदाचा सामना करावा लागणार आहे. हे दोन सामने स्पर्धेची दिशा निश्चित करणार आहेत. गुकेशसाठी कारुआनाविरुद्धचा सामना महत्त्वाचा असेल; कारण तो पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणार आहे. कारुआना सलग सहाव्यांदा या स्पर्धेत सहभागी होत आहे, पण त्याला केवळ एकदाच स्पर्धा जिंकता आली आहे.