गुप्टिलची विक्रमी खेळी पुनरागमनास पुरेशी नाही
By admin | Published: March 3, 2017 12:16 AM2017-03-03T00:16:52+5:302017-03-03T00:16:52+5:30
सलामीवीर मार्टिन गुप्टिल याने द. आफ्रिकेविरुद्ध चौथ्या वन-डेत विक्रमी शतक ठोकले.
वेलिंग्टन : सलामीवीर मार्टिन गुप्टिल याने द. आफ्रिकेविरुद्ध चौथ्या वन-डेत विक्रमी शतक ठोकले. पण त्याची ही खेळी कसोटी संघात स्थान मिळविण्यास पुरेशी नसल्याचे मत न्यूझीलंडचे कोच माइक हेसन यांनी व्यक्त केले आहे.
गुप्टिलने हॅमिल्टन येथे १३८ चेंडूत नाबाद १८० धावा ठोकल्या. यामुळे न्यूझीलंडने द. आफ्रिकेचा सात गड्यांनी पराभव केला. मालिका देखील २-२ अशी बरोबरीत आली आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांकडून द. आफ्रिकेविरुद्ध वन-डेत ठोकलेल्या या सर्वोच्च धावा ठरल्या.
हेसन यांनी गुप्टिल याच्या खेळीचे तोंडभरून कौतुक केले. सोबतच ३० वर्षांच्या गुप्टिलला आधीदेखील कसोटीत खेळण्याची संधी दिली पण तो अपयशी ठरल्याचे नमूद केले. द. आफ्रिकेविरुद्ध सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात येणार नाही, असे हेसन यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, ‘मार्टिनचा रेकॉर्ड असला तरी तो कसोटी संघात दिसणार नाही. एखाद्या प्रकारात खेळणारा खेळाडू दुसऱ्या प्रकारात यशस्वी ठरेलच
असे नाही. जगभरात अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतील. क्रिकेटचे सर्व तिन्ही प्रकार अन्य प्रकारांपासून भिन्न आहेत. गुप्टिलची वन-डेतील सरासरी ४३.९८ अशी असली तरी कसोटीत त्याने केवळ २९.३८ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
मागच्या वर्षी भारत दौऱ्यानंतर गुप्टिलला कसोटी संघातून डच्चू देण्यात आला होता. भारत दौऱ्यात त्याने सहा डावांत केवळ एक अर्धशतक ठोकले होते. (वृत्तसंस्था)