गर्बाइन मुगुरुजा स्पर्धेबाहेर...

By admin | Published: September 2, 2016 03:13 AM2016-09-02T03:13:16+5:302016-09-02T03:13:16+5:30

अव्वल खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्स हिच्या विक्रमी विजेतेपदाच्या मार्गातील मुख्य अडसर मानली जाणारी स्पेनची गर्बाइन मुगुरुजा हिला यूएस ओपनमध्ये दुसऱ्याच फेरीमध्ये

Gurbine Mughuraja out of competition ... | गर्बाइन मुगुरुजा स्पर्धेबाहेर...

गर्बाइन मुगुरुजा स्पर्धेबाहेर...

Next

न्यूयॉर्क : अव्वल खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्स हिच्या विक्रमी विजेतेपदाच्या मार्गातील मुख्य अडसर मानली जाणारी स्पेनची गर्बाइन मुगुरुजा हिला यूएस ओपनमध्ये दुसऱ्याच फेरीमध्ये धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. लात्वियाच्या बिगरमानांकित अनास्तासिजा सेवासोवाने मुगुरुजाचे आव्हान संपुष्टात आणताना स्पर्धेत खळबळ माजवली. त्याच वेळी पुरुष गटात स्पेनच्या राफेल नदालने अपेक्षित विजय मिळवताना तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
तिसरी मानांकित मुगुरुजा चौथ्यांदा यूएस ओपनमध्ये खेळत होती. या वेळी तिची मोहीम दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आली. चमकदार खेळ केलेल्या सेवासोवाने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना मुगुरुजाला ७-५, ६-४ असा स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे फ्लशिंग मिडोज हार्ड कोर्टवर नेहमीच झगडणारी मुगुरुजा या वेळी पुन्हा एकदा अपयशी ठरली.
दखल घेण्याची बाब म्हणजे, जर मुगुरुजाने या सामन्यात बाजी मारून स्पर्धेचे जेतेपद पटकावले असते, तर ती सेरेनाला पिछाडीवर टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आली असती. मात्र, पहिल्याच फेरीत विजयी झाल्यानंतर मुगुरुजाने सांगितले होते, की केवळ चमत्कारच मला या स्पर्धेत विजयी करू शकतो.
महिलांच्या अन्य सामन्यात, दुसरी मानांकित जर्मनीच्या एंजलिक केर्बरने क्रोएशियाच्या बिगरमानांकित लुसिस बरोनीचा ६-२, ७-६ असा पाडाव करत आगेकूच केली. आॅस्टे्रलियन ओपन विजेती कर्बरला पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये कडव्या लढतीस सामोरे जावे लागले. मात्र, मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना तिने आगेकूच केली. त्याच वेळी नववी मानांकित रशियाच्या स्वेतलाना कुझ्नेत्सोवालाही अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागले. डेन्मार्कच्या कॅरोलीन वोज्नीयाकीने सरळ दोन सेटमध्ये कुझ्नेत्सोवाला ६-४, ६-४ असे नमवले.
दुसरीकडे बलाढ्य राफेल नदालने आपल्या लौकिकानुसार विजयी घोडदौड कायम ठेवताना इटलीच्या आंद्रियस सेप्पीला ६-०, ७-५, ६-१ असे नमवून तिसरी फेरी गाठली. पावसाच्या व्यत्ययामुळे स्टेडियमचे छत ५ मिनिट ३५ सेकंदांमध्ये बंद करण्यात आले. तोपर्यंत सामना थांबवण्यात आला होता. मात्र, खेळ सुरू झाल्यानंतर नदालने आक्रमक खेळ करताना सहज बाजी मारली. (वृत्तसंस्था)

जोकोला वॉकओव्हर
गतविजेता आणि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला तिसऱ्या फेरीसाठी बाय मिळाला.
प्रतिस्पर्धी झेक प्रजासत्ताकच्या जिरी वेसले याने दुखापतीमुळे माघार घेतल्याने जोकोला कोणत्याही अडचणीशिवाय तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला.
विशेष म्हणजे पहिल्या फेरीत जोकोविचलाही हाताला दुखापत झाली होती. आता, अर्जेंटिनाचा गुइडो पेला आणि रशियाचा मिखाइल याउजेनी यांच्यातील विजेत्याशी जोकोचा सामना तिसऱ्या फेरीत होईल.

भारतीयांची विजयी आगेकूच...
अनुभवी लिएंडर पेस, रोहन बोपन्ना आणि जागतिक महिला दुहेरीतील अव्वल खेळाडू सानिया मिर्झा यांनी आपापल्या गटात अपेक्षित विजय मिळवताना यूएस ओपनमध्ये आगेकूच केली आहे. मिश्र दुहेरीत गत विजेत्या पेस- मार्टिना हिंगीस (स्वित्झर्लंड) या जोडीने विजयी सलामी देताना अमेरिकेच्या साचिया विकेरी-फ्रान्सीस टियाफो यांचा ६-३, ६-२ असा धुव्वा उडवला.

महिला दुहेरीत सातवे मानांकन असलेल्या सानिया व झेक प्रजासत्ताकच्या बार्बरा स्ट्रायकोवा यांनी अमेरिकेच्या जाडा एम हार्ट-एना शिबाहारा यांचा ६-३,
६-२ असा पराभव करून विजयी सलामी दिली.
पुरुष दुहेरीत बोपन्नाने डेन्मार्कच्या फ्रेडरिक नीलसनसह खेळताना राडेक स्टेपनाक (झेक प्रजासत्ताक)
- नेनाद जिमोंजिच (सर्बिया)
यांचा ६-३, ६-७, ६-३ असा पाडाव केला.

पहिल्यांदाच झाला
बंद छताखाली सामना
नदाल - सेप्पी यांच्या लढतीदरम्यान झालेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे आर्थर ऐश स्टेडियमचे छत बंद करण्यात आले होते. विशेष म्हणजे पहिल्यांदाच यूएस ओपनमध्ये बंदिस्त छताखाली सामना खेळविण्यात आला.
बुधवारी रात्री झालेल्या या सामन्यादरम्यान पावसाला सुरुवात झाल्यानंतर सामना केवळ साडेसात मिनिटांपर्यंत थांबवण्यात आला. स्पर्धेत पहिल्यांदाच बंद छताखाली सामना खेळविण्यात आला.

Web Title: Gurbine Mughuraja out of competition ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.