गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताचे नेतृत्त्व

By Admin | Published: September 2, 2016 07:14 PM2016-09-02T19:14:11+5:302016-09-02T19:14:11+5:30

अंधेरी क्रीडा संकुलामध्ये शनिवारी प्यूर्टो रिको देशाविरुद्ध होणाºया एकमेव आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्यासाठी गोलरक्षक गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताची धुरा सोपविण्यात आली

Gurpreet Singh leads India to Sindhu | गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताचे नेतृत्त्व

गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताचे नेतृत्त्व

googlenewsNext
>- ऑनलाइन लोकमत
आंतरराष्ट्रीय मैत्री फुटबॉल सामना : प्यूर्टो रिकोविरुध्द भारत सज्ज
मुंबई, दि. 2 - येथील अंधेरी क्रीडा संकुलामध्ये शनिवारी प्यूर्टो रिको देशाविरुद्ध होणाºया एकमेव आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्यासाठी गोलरक्षक गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताची धुरा सोपविण्यात आली. राष्ट्रीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्सटेनटाइन शुक्रवारी सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. 
 
कॉन्सटेनटाइन यांनी यावेळी सांगितले की, ‘‘या मैत्रीसामन्यासाठी गुरप्रीत भारतीय संघाचे नेतृत्त्व करेल.’’ २४ वर्षीय गुरप्रीतसाठी कर्णधार म्हणून मोठा सन्मान मिळाला आहे. विशेष म्हणजे यासह भारतीय संघाचे नेतृत्त्व करणाºया युवा खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होईल. त्याने नॉर्वे देशाच्या स्टाबीक एफसीकडून खेळताना गुरप्रीतने युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारा पहिला भारतीय असा लौकिक मिळवला आहे.
 
दखल घेण्याची बाब म्हणजे, संघातील हुकमी खेळाडू सुनिल छेत्रीच्या जागी गुरप्रीतची कर्णधारपदी निवड झाली असल्याने, अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉलला या सामन्यात बेंचवर बसावे लागणार हे निश्चित आहे. काहीदिवसांपुर्वीच पॉलला अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 
 
दुसरीकडे हा मैत्री सामना मुंबईकरांसाठी विशेष असेल. तब्बल १९५५ सालानंतर पहिल्यांदाच मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्याचे आयोजन होत आहे. त्यावेळी मुंबईत भारत विरुद्ध सोवियत संघ यांच्यात सामना झाला होता. त्याचवेळी जागतिक क्रमवारीत स्थान उंचावण्यासाठी भारताला हा सामना महत्त्वाचा असून प्यूर्टो रिको संघाविरुध्द बाजी मारल्यास भारत नक्कीच आपले स्थान सुधारु शकतो. सध्या भारतीय संघ जागतिक क्रमवारीत १५२व्या स्थानी असून प्यूर्टो रिको संघ ११४व्या स्थानी विराजमान आहे. तसेच यंदाच्या वर्षातील भारताचा हा पाचवा आंतरराष्ट्रीय सामना आहे.
 
सामन्याच्या बरोबर एक दिवस आधी शुक्रवारी संध्याकाळी प्यूर्टो रिको संघाचे  भारतात आगमन होणार असून याचा भारतीय संघाला काहीही फायदा होणार नसल्याचे प्रशिक्षक कॉन्सटेनटाइन यांनी सांगितले. कॉन्सटेनटाइन यांनी सांगितले की, ‘‘त्याचा संघ चांगला असून त्यांच्याकडे काही शानदार खेळाडू आहेत. हा मुंबईत स्थिरावण्यास त्यांना नक्कीच कमी वेळ मिळेल. पण, तरीही यामुळे त्यांची क्षमता कमी होणार नाही. फीफा रँकींगमध्ये वेगाने आगेकूच करणाºया संघांमध्ये प्यूर्टो रिकोचा समावेश आहे.’’
 ‘‘त्यांचा खेळ चांगला आहे. चेंडू आपल्याकडे जास्तवेळ ठेवून पुढे नेण्यावर त्यांचा भर असतो. तांत्रिकदृष्ट्या त्यांचा संघ उजवा आहे. तसेच ‘डी’ भागामध्ये ते अधिक धोकादायक व आक्रमक असतात. अमेरिकाविरुध्द त्यांनी काहीवेळा त्यांच्या बचावफळीलाही भेदले होते. त्यांच्यामध्ये व गुआम संघामध्ये साम्य आहेत. त्यांचे अनेक खेळाडू अमेरिकेत खेळत असून त्यांची ‘प्यूर्टो रिको एफसी’ ही टीम अमेरिकन लीगमध्ये खेळते. शिवाय काही खेळाडू युरोपियन लीगमध्येही खेळत असल्याने त्यांचा संघ मजबूत आहे,’’ असेही कॉन्स्टेनटाइन यांनी यावेळी सांगितले. 
 
आम्ही सध्या खेळाडूंची मजबूत फळी तयार करीत आहोत, जे पुढील ६-७ वर्षांसाठी भारताचे प्रतिनिधित्त्व करतील. खरं, म्हणजे आम्ही सध्याच्या घडील चांगली फळी तयार केली असून, आज प्रत्येक जागेसाठी आमच्याकडे उत्तम खेळाडू आहेत. आम्ही जागतिक क्रमवारीत ११४व्या स्थानी असलेल्या संघाविरुध्द खेळण्यास उत्साहित आहोत. जर आपल्याला रँकींग वाढवायची असेल, तर मजबूत संघाविरुध्द खेळणे आवश्यक आहे. त्यामुळेच भूतानविरुध्द ३-० अशा विजयाऐवजी इराणकडून मिळालेल्या ०-४ असा पराभव मला पसंद आहे.
- स्टिफन कॉन्सटेनटाइन
 

Web Title: Gurpreet Singh leads India to Sindhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.