गुरुसाईदत्त, साईप्रणीत मुख्य स्पर्धेत
By admin | Published: April 7, 2015 11:26 PM2015-04-07T23:26:46+5:302015-04-07T23:26:46+5:30
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कास्यपदक विजेता आरएमव्ही गुरुसाईदत्त आणि युवा खेळाडू बी. साई प्रणीत हे सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये पोहोचले आहेत.
सिंगापूर : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कास्यपदक विजेता आरएमव्ही गुरुसाईदत्त आणि युवा खेळाडू बी. साई प्रणीत हे सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये पोहोचले आहेत.
गुरुसाईदत्तने पुरुष एकेरीच्या पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीत थायलंडच्या बुनसाक पोनसाना याचा १८-२१, २१-१८, २१-१८ असा पराभव केला. त्यानंतर त्याने चीन तैपईच्या जू वेई वाँग याच्यावर २१-९, २१-१३ असा विजय मिळवला.
प्रणीतने डेन्मार्कच्या रास्मस फ्लाडबर्ग याचा १८-२१, २१-१८, २१-१२ असा पराभव केला. त्यानंतर मलेशियाच्या जुल्फादली जुल्किफ्लीने माघार घेतल्याने प्रणीतचा मुख्य फेरीतील प्रवेश सुकर झाला. गेल्या महिन्यात युगांडा आणि रोमानिया येथे विजेतेपद पटकावणारे कोना तरुण आणि एन. सिक्की रेड्डी यांनीही मुख्य ड्रॉमधील आपला प्रवेश निश्चित केला. त्यांनी सिंगापूरच्या जियान लियांग ली आणि जिया यिंग क्रिस्टल वोंग यांचा २१-११, २१-१२ असा पराभव केला आणि त्यानंतर मलेशियाच्या रजीफ अब्दुल लतीफ व एस. सानिरू यांना २१-११, २१-१७ असे नमवले.
तथापि, अजय जयराम मुख्य फेरीत पोहोचू शकला नाही. त्याने पहिल्या फेरीत मलेशियाच्या डारेन लिये याचा २१-३, १४-२१, २१-१७ असा पराभव केला; परंतु दुसऱ्या फेरीत त्याला सायमन सेंतोसो याच्याकडून १६-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरील खेळाडू किदाम्बी श्रीकांत, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन पारुपल्ली कश्यप आणि इंडोनेशिया मास्टर्सचा विजेता एच.एस. प्रणय हे उद्यापासून
आपल्या अभियानास सुरुवात करतील. (वृत्तसंस्था)