ब्राझीलकडून हैतीचा धुव्वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 03:50 AM2016-06-10T03:50:23+5:302016-06-10T03:50:23+5:30
फिलिप कुटिन्हो याने नोंदविलेल्या तीन गोलांच्या बळावर आठ वेळच्या जेत्या बलाढ्य ब्राझीलने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत हैतीचा ७-१ने धुव्वा उडविला.
कोपा अमेरिका : फिलिप कुटिन्हो याने नोंदविलेल्या तीन गोलांच्या बळावर आठ वेळच्या जेत्या बलाढ्य ब्राझीलने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत हैतीचा ७-१ने धुव्वा उडविला.
ब गटात बुधवारी झालेल्या या सामन्यात सहज विजय मिळवून ब्राझीलने ४ गुणांसह गटात अव्वल स्थान राखले आहे. यापूर्वी ब्राझीलचा इक्वेडोर संघाशी झालेला सामना ०-० असा बरोबरीत सुटला होता, तर पेरूने हैती संघाला १-०ने मात दिली होती. मध्यरक्षक कुटिन्हो याने १४व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ २९व्या मिनिटाला गोल करून कुटिन्होने दुसरा गोल करून आघाडी वाढविली. त्यानंतर ३३व्या मिनिटाला हैतीला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र, ब्राझीलच्या बचावफळीने त्यांचा प्रयत्न विफल केला. यानंतर दोनच मिनिटांनी रेनातो अगस्तोने तिसरा गोल करून आघाडी ३-०ने वाढविली.
गॅब्रियलने ५९व्या, लुकास लिमाने ६७व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी ५-० अशी वाढविली. त्यानंतर हैतीचा मार्सेलिन याने ७०व्या मिनिटाला गोल करून आघाडी १-५ अशी कमी केली. मात्र, तोपर्यंत ब्राझीलने सामन्यावर पूर्ण पकड मिळविली होती. अगस्तो याने ८६व्या मिनिटाला, तर कुटिन्हो याने अतिरिक्त वेळेत वैयक्तिक तिसरा गोल नोंदवून ब्राझीलला ७-१ असा सहज विजय मिळवून दिला. (वृत्तसंस्था)
>मेस्सी खेळण्याची शक्यता
अर्जेंटिनाचा प्रसिद्ध खेळाडू लियोनेल मेस्सी पनामा संघाविरुद्ध आज, शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात होंडुरास संघाशी झालेल्या लढतील मेस्सीच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे कोपा अमेरिका स्पर्धेतील चिली संघाशी झालेल्या पहिल्या लढतीत मेस्सी खेळू शकला नव्हता. पनामाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी झालेल्या सरावसत्रात मेस्सीने हजेरी लावून कसून सराव केला.