हरभजनसिंगमुळे सामन्याला कलाटणी
By admin | Published: May 21, 2015 12:24 AM2015-05-21T00:24:09+5:302015-05-21T00:24:09+5:30
हरभजनसिंगने सलग दोन चेंडूंत घेतलेले दोन बळी आमच्या संघासाठी महागडे ठरले. त्यामुळे मुंबई इंडियन्सला २५ धावांनी विजय मिळवून आयपीएल आठमध्ये अंतिम फेरी गाठण्यात यश मिळाले,
मुंबई : हरभजनसिंगने सलग दोन चेंडूंत घेतलेले दोन बळी आमच्या संघासाठी महागडे ठरले. त्यामुळे मुंबई इंडियन्सला २५ धावांनी विजय मिळवून आयपीएल आठमध्ये अंतिम फेरी गाठण्यात यश मिळाले, असे चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले.
एक वेळ १८८ धावांचे लक्ष्य गाठू शकू असे वाटत होते; परंतु हरभजनसिंगने सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीला बाद करीत सामन्याला कलाटणी दिली, असे फ्लेमिंग म्हणाले.
फ्लेमिंग म्हणाले की, ‘आम्ही लक्ष्याचा चांगला पाठलाग करीत होतो; परंतु हरभजनसिंगच्या दोन चेंडूंनी सामन्याचे चित्रच पालटले. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना नियमितपणे विकेट गमावल्या, तर विजय मिळवणे कठीण होते. आमच्यासोबतही हेच झाले. आम्ही दोन मोठे खेळाडू रैना आणि धोनी यांना गमावले. त्यामुळे हा टर्निंग पॉइंट होता.
हरभजनसिंगने जम बसलेल्या सुरेश रैना (२५) याला झेल देण्यास भाग पाडले आणि नंतर पुढच्याच चेंडूवर धोनीला पायचीत केले. हरभजनने २६ धावांत २ बळी घेतले.
त्याचबरोबर फ्लेमिंग यांनी मुंबईचा लेंडल सिमन्स (६५) आणि पार्थिव पटेल (३५) यांच्यातील सलामीसाठी झालेली भागीदारीही पराभवाचे एक कारण असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, हा चुरशीचा सामना होता. मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे कठीण आहे हे आम्हाला माहीत होते. त्यांनी खूप चांगला खेळ केला. पहिले सहा षटके महत्त्वाची होती. आम्हाला सुरुवातीला दोन विकेटस् घेण्याची आवश्यकता होती; परंतु त्यांच्या सलामीच्या जोडीने चांगली भागीदारी केली. आम्ही त्यांना १८७ धावांवर रोखून चांगली कामगिरी केली, असे मला वाटते.’(वृत्तसंस्था)