हरभजनसिंगची स्वप्नातही भीती वाटते
By admin | Published: September 6, 2016 01:50 AM2016-09-06T01:50:53+5:302016-09-06T01:50:53+5:30
जगातील सर्वोत्तम लेगस्पिनर आॅस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर षटकार ठोकून भीती दाखवत होता
नवी दिल्ली : जगातील सर्वोत्तम लेगस्पिनर आॅस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर षटकार ठोकून भीती दाखवत होता, तर आता वॉर्नचा कर्णधार रिकी पॉन्टिंगने कबुली दिली आहे, की भारतीय आॅफस्पिनर हरभजनसिंग त्याला आताही स्वप्नात भीती दाखवतो.
जगातील सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आणि सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणल्या जाणारा पॉन्टिंग सोमवारी आॅस्ट्रेलियन दूतावासामध्ये एका क्रिकेट कार्यशाळेत सहभागी झाला होता. त्यानंतर पत्रकारांना तो म्हणाला, ‘‘मी भारताविरुद्ध खेळत असताना माझा एकमेव प्रतिस्पर्धी हरभजनसिंग असायचा. मला आताही स्वप्नात तो भीती दाखवितो.’’
हरभजन आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान संबंध वादग्रस्त होते. हजभजन व सायमंड््स यांच्यादरम्यानचा वाद कुणी विसरू शकत नाही. पण, पॉन्टिंगने आयपीएलमध्ये हरभजनसिंग असलेल्या मुंबई इंडियन्स संघाचेच प्रतिनिधित्व केलेले आहे, हे विशेष. पॉन्टिंग मुंबई संघाचा मेंटॉरही आहे.
भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली प्रतिभावान फलंदाज असल्याचे सांगताना पॉन्टिंग म्हणाला, ‘‘विराट समकालीन फलंदाजांमध्ये फार आघाडीवर आहे. प्रतिभेचा विचार करता आॅस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ, न्यूझीलंडचा केन विल्यम्सन आणि भारताचा विराट कोहली सारखे आहेत.’’ (वृत्तसंस्था)